संततधार पावसाने आंबेनळी घाट धोक्यात; दरड, मातीचा ओसरा आणि झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

रायगड | अमुलकुमार जैन
संततधार पावसामुळे पोलादपूर-वाई-महाबळेश्वर-सुरूर राज्य मार्गावरील आंबेनळी घाटात दरडीची टांगती तलवार कायम असून मंगळवारी सायंकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मातीचा ओसरा व झाड कोसळल्याने वाहतूक काही तासांसाठी पूर्णपणे ठप्प झाली. पोलादपूर तालुक्यातील कुंभळवणे फाटा येथे मातीचा ओसरा रस्त्यावर आला, तर कापडे ते पायटा दरम्यान मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच पोलादपूर आपत्ती निवारण कक्ष, पोलादपूर पोलीस तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ठेकेदाराच्या जेसीबीच्या साह्याने दगड, माती व झाड हटविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला.
मंगळवारी सायंकाळी सुमारे ६.४१ वाजण्याच्या सुमारास रानकडसरी परिसरात दगड कोसळल्याची नोंद झाली. त्यापूर्वी कुंभळवणेजवळ मातीचा ओसरा रस्त्यावर आल्याने दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. हवामान विभागाने पुढील पाच दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आंबेनळी घाटातील दरडीचा धोका आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गेली अनेक वर्षे आंबेनळी घाट दरडग्रस्त म्हणून ओळखला जात असून दर पावसाळ्यात या मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. सध्या या राज्य मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून अनेक ठिकाणी डोंगर उभे कापण्यात आल्याने दरडीचा धोका अधिक वाढल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे, पोलादपूर पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीची पाहणी केली. गेल्या २४ तासांत पोलादपूर येथे ६६ मिमी, प्रतापगड खोऱ्यात ४७ मिमी आणि महाबळेश्वर खोऱ्यात ३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
संततधार पाऊस आणि सुरू असलेली रस्ता रुंदीकरणाची कामे लक्षात घेता आगामी काळात दरडी कोसळण्याचा धोका कायम राहणार असल्याने प्रशासनाने तसेच या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.