श्रीवर्धन तालुक्यातील मौजे वेळास आदगाव येथील वेळास आगर बिचवर रविवारी सकाळी क्रिकेट खेळत असताना बॉल समुद्रात गेल्याने तो पकडण्यासाठी पाण्यात गेलेल्या तीन तरुणांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत शेतकरी कामगार पक्षाचे म्हसळा तालुक्याचे चिटणीस संतोष पाटील यांचे दोन तरुण मुलं – अवधूत संतोष पाटील (वय 26) व मयुरेश संतोष पाटील (वय 23), तसेच त्यांचा मुंबई ऐरोली येथून आलेला पाहुणा हीमांशू संतोष पाटील यांचा समावेश आहे.
वेळास आगर बिच हा सामान्यतः सुरक्षित मानला जातो, मात्र या ठिकाणी पोहण्यासाठी जाण्यापूर्वी योग्य ती काळजी घेणे अत्यावश्यक आहे. दुर्दैवाने या तिघांना पोहता येत नसल्याची माहिती समोर आली आहे. बॉल घेण्याच्या प्रयत्नात ते समुद्राच्या खोल भागात गेले आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले.
घटनेची माहिती मिळताच वेळास गावातील तरुण, दिवेआगरचे सरपंच व उपसरपंच यांनी तात्काळ चार ते पाच जेटस्की बोटी घटनास्थळी पाठविल्या. वेगाने हालचाल करत वेळास, आदगाव येथील स्थानिक तरुण आणि दिघी सागरी पोलीस यांनी तिघांना बाहेर काढले. त्यानंतर बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, नाका तोंडात पाणी गेल्याने त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली आणि अखेर तिघांचाही मृत्यू झाला.
या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोष पाटील यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.