महाराष्ट्र शासनाने 2025 सालासाठी स्थानिक सुट्ट्यांमध्ये महत्त्वाचा बदल करत गोपाळकाला (दहीहंडी) व अनंत चतुर्दशीच्या सुट्ट्या रद्द केल्या असून, त्याऐवजी नारळी पौर्णिमा (८ ऑगस्ट, शुक्रवार) आणि ज्येष्ठगौरी विसर्जन (२ सप्टेंबर, मंगळवार) या दोन दिवसांना स्थानिक सुट्टी घोषित केली आहे. हा निर्णय मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी लागू असेल.
पूर्वी १६ ऑगस्ट २०२५ रोजी गोपाळकाला व ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी या दिवशी स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या शासन शुद्धीपत्रकानुसार या सुट्ट्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यामुळे आता मुंबईतील शाळा, कॉलेजेस आणि विविध कार्यालयांना नव्याने जाहीर केलेल्या दिवशी सुट्टी मिळणार आहे.
या निर्णयाची माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली असून, राज्यपालांच्या आदेशानुसार हे शुद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. उप सचिव दिलीप देशपांडे यांनी या आदेशावर डिजिटल स्वाक्षरी केली आहे. अधिकृत परिपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर संकेतांक 202508071434078707 नुसार उपलब्ध आहे.