पोलादपूर ( शैलेश पालकर ) : राज्यातील शिवसेनेच्या गद्दारांचा समाचार घेण्याची सुरूवात गद्दारीची सुरूवात झालेल्या रायगड जिल्ह्यापासून करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे शुक्रवारी पोलादपूर येथे जाहिर सभा घेणार असल्याची माहिती माजीमंत्री अनंत गीते यांनी सभास्थळी आढावा घेताना दिली.
याप्रसंगी अनंत गीते यांच्यासमवेत महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप कामत, जिल्हाप्रमुख अनिल नलावडे, दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय मानाजी कदम, रायगड जिल्हा बँकेचे संचालक हनुमंत जगताप, तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, पद्माकर मोरे, तालुका महिला संघटिका माजी नगराध्यक्षा अश्विनी गांधी, शहर प्रमुख निलेश सुतार, शहर संघटीका वैशाली चिकणे, माजी सभापती दिलीप भागवत, नगरसेविका श्रावणी शहा, सान्वी गायकवाड, तेजश्री गरूड, धामणदिवी सरपंच क्षमता बांद्रे, कोतवालचे माजी सरपंच महेश दरेकर, माजी राजिप सदस्य मुरलीधर दरेकर, कापडे बुद्रुकचे माजी सरपंच अजय सलागरे, अमोल भुवड तसेच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होती.
शुक्रवार, दि. 2 फेबु्रवारी 2024 रोजी सकाळी पोलादपूर शहरातील भैरवनाथनगर सहाणेवरील मंडपामध्ये जाहिर सभा आयोजित करण्यात आली असून तालुकाप्रमुख अनिल मालुसरे यांनी प्रास्ताविकामध्ये पोलादपूर तालुक्यात प्रथमच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहिर सभा आयोजित करण्यात येणार असल्याने शिवसैनिकांसाठी अभिमानाचा क्षण जवळ आला असल्याचे यावेळी सांगितले.
ज्येष्ठ शिवसैनिक व माजी उपसभापती संभाजीदादा साळुंखे यांनी पोलादपूर तालुक्यातील कारसेवकांचा सत्कार याप्रसंगी माननीय उध्दव ठाकरे यांच्याहस्ते होण्याची सुचना मांडली असता माजीमंत्री अनंत गीते या सुचनेचे स्वागत केले. यावेळी अनंत गीते यांनी, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचेच भाषण होणार असल्याने त्याआधी स्थानिक नेत्यांची भाषणे होतील असे सांगितले. शिवसैनिक व महिलांसोबत पक्षप्रमुख ठाकरे यांचा संवाद होणार असून स्थानिक प्रश्नांवरही माननीय उध्दव ठाकरे यांचे भाष्य व्हावे, यासाठी शिवसैनिकांनी काही महत्वाचे प्रश्न मांडावे, अशी सूचना यावेळी अनंत गीते यांनी केली.
याप्रसंगी शिवसेना नेते अनंत गीते यांच्याहस्ते महिला आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.