शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल यांची रायगड जिल्ह्याला भेट !

Zp Devol
अलिबाग ( अमुलकुमार जैन ) :
महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल यांनी रायगड जिल्ह्याला सदिच्छा भेट दिली. या दौऱ्यात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयातील युनेस्कोचे सल्लागर सिद्धेश वाडकर उपस्थित होते. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल यांचे मांडवा येथे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांनी मांडवा येथे स्वागत केले.
जिल्हा परिषद अलिबाग येथील कै.ना.ना.पाटील सभागृहात रायगड जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी(शिक्षण), सर्व नप/नपा यांचे प्रशासन अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती यांच्या आढावा सभेत जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगती बाबत माहिती जाणून घेतली. सदर सभेचे प्रास्ताविक करताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगतीची माहिती विशद केली. जिल्ह्यात एकूण 3583 शाळांमध्ये 19515 शिक्षक कार्यरत असून एकूण 59810 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण 81 विद्यार्थी नवोदय परीक्षेत यशस्वी झाले शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे पूर्व माध्यमिक व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क जि.प. सेस फ़ंडातून भरण्याची योजना अमलात आणली आहे.
सदर शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शनासाठी विशेष मार्गदर्शन वर्ग व सराव चाचणी वर्गांचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच जिल्हा नियोजन समिती माध्यमातून जास्तीत जास्त शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, दुरुस्ती पूर्ण करणे, नवीन इमारत बांधकाम आदी नियोजन करण्यात आले आहे. सौर ऊर्जेचा प्रसार व उपयोगिता याचे महत्त्व जाणून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांमध्ये सौर उर्जेचा वापर करण्याचा दृष्टीने आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये मुरुड गटातील 100% सर्व ग्रामपंचायत ,शाळा व गावांचा प्रथम टप्प्यात समावेश करण्यात येणार आहे. स्काऊट गाईड या योजनेकरिता रु 2 लक्ष तरतूद वितरित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 3 शाळांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात बक्षीस पटकावले आहे.
यानंतर सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करताना सचिव रणजितसिंह देवोल यांनी शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले, त्याचप्रमाणे स्थानिक व्यवस्थापनाच्या शाळा मधील शैक्षणिक गुणवत्ता/ दर्जावाढ करीता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिष मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करणे राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणे व SCERT , DIET मार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रम/उपक्रम अंमलबजावणी बाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सदर सभेला मुख्य कार्यकारी रा.जि.प. अलिबाग,शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तसेच जिल्ह्स्तरीय शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल यांनी रायगड जिल्हा परिषद शाळा झिराड, रायगड जिल्हा परिषद शाळा नवगाव, रायगड जिल्हा परिषद वायशेत , रायगड जिल्हा परिषद शाळा कुरुळ या अलिबाग गटातील शाळांना भेटी दिल्या.
सदर शाळा भेटी मध्ये महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल यांनी विद्यार्थी व शिक्षक यांच्या समवेत शैक्षणिक हितगुज केली. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मार्फत पुरविण्यात आलेल्या रोबोटीक लॅब, टिकलिंग लॅब, ICT लॅब , सेनेटरी व्हेंडिंग मशीन व इतर साहित्यांची पाहणी केली. तसेच त्याचा वापर व उपयोगिता याबाबत विद्यार्थी व शिक्षक यांच्या समवेत संवाद साधला. भौतिक सुविधा अंतर्गत संरक्षक भिंत , स्मार्ट क्लासरूम यांची ही पाहणी केली. सर्व शाळांमध्ये उपलब्ध विविध शैक्षणिक साहित्य ( गणित पेटी, विज्ञान पेटी व इतर) विद्यार्थ्यांना मुक्तहस्ते हाताळण्यासाठी द्यावे, विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार रंजक व सुलभ पध्दतीने अध्ययन व अध्यापन प्रक्रिया होणे अपेक्षित आहे असे मार्गदर्शन केले. महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल यांच्या भेटीमुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षक व विद्यार्थी व शाळांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *