शहर झालं स्वच्छ, सुंदर : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम

शहर झालं स्वच्छ, सुंदर डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम
माथेरान (मुकुंद रांजणे ) : 
थोर निरुपणकार महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त माथेरान मध्ये स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली. यामध्ये श्री सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन माथेरानचा संपूर्ण परिसर चकाचक केला.
दि.२ रोजी थोर निरुपणकार महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त  धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण देशभरात स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली.यामध्ये येथील श्री सदस्यांनी सुध्दा या मोहिमेत आपला सहभाग नोंदवून रेल्वे स्टेशन, दवाखाना, सर्व शासकीय कार्यालये,नागरी वस्ती, मुख्य बाजारपेठ त्याचप्रमाणे विविध पॉईंट भागात जाऊन सुका कचरा गोळा केला आहे.
जवळपास तीनशे गोणी सुका कचरा यामध्ये प्लास्टिक बाटल्या, रॅपर्स,गुटखा पाकिटे तसेच अन्य प्लास्टिक कचरा संकलन करून नगरपरिषदेच्या कामगार वर्गाकडे सुपूर्द केला आहे. नागरी वस्तीच्या ठिकाणी ही स्वच्छता मोहीम पाहून ज्या ज्या नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत मानसिकता नाही त्यांच्यात निश्चितच परिवर्तन होण्याची शक्यता यानिमित्ताने अधोरेखित होत आहे. 
जिथे स्वच्छतेच्या बाबतीत शासनाने गुडघे टेकले त्यावेळी धर्माधिकारी प्रतिष्ठान श्री सदस्यांना सोबत घेऊन सकारात्मकपणे आपले कार्य अविरतपणे करीत असते.माथेरान मधील दोनशे तर तालुक्यातील श्री सदस्यांनी सुध्दा इथे येऊन या मोहिमेत सहभागी होऊन हे सुंदर पर्यटनस्थळ चकाचक करण्यासाठी मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *