भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. जिल्ह्यात कोकण विभाग पदवीधर निवडणुकीसाठी दिनांक २६ जून २०२४ रोजी मतदान होत आहे. काही संघटनांनी या मतदानाची वेळ वाढविण्यासाठी केलेली मागणी भारत निवडणूक आयोगाने मान्य केली असून; आता मतदानाची वेळ सकाळी ७.०० वाजेपासून सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत अशी असेल.
या निवडणुकीसाठी शुक्रवार, ३१ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. कोकण विभाग पदवीधर जागेकरिता बुधवार, दि.२६ जून रोजी मतदान तर सोमवार, दि.१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे यांनी दिली आहे.