नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव सभागृहात मांडल्यानंतर त्या ठरावाला नगरसेवकांच्याच विरोध होण्याची आवश्यकता होती. सुरुवातीला वाढीव घरपट्टीला एकमुखी पाठिंबा आणि नंतर वाढीव घरपट्टीला एकमताने विरोध करण्याच्या दुटप्पी भूमिकेमुळे नागरिकांना दहा पटीने करवाढ सहन करावी लागत आहे. पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील वाढीव घरपट्टी संदर्भात आमदारकीचा शपथविधी झाल्यानंतर आवश्यक ते प्रयत्न करण्याची ग्वाही कोकण विभागीय स्थानिक स्वराज्य संस्थांचे नवनिर्वाचित बिनविरोध विधानपरिषद सदस्य आ.अनिकेत तटकरे यांनी दिली.
आ.अनिकेत तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजित खेडेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी पोलादपूर नागरिक समस्या निवारण मंचाचे अध्यक्ष शैलेश पालकर, सेक्रेटरी सुनील भिलारे, नितीन मधुकर शेठ व अन्य सदस्यांनी आ.अनिकेत तटकरे यांची भेट घेतली.
पोलादपूर शहरातील इमारतींची वाढीव घरपट्टीची मागणी नगरपंचायतीकडून मागणीपत्राने होत असून मार्च अखेरपर्यंत घरपट्टी न भरल्यास 2 टक्के चक्रवाढ व्याज आकारणी तसेच 2023-24 च्या घरपट्टी वाढीच्या तुलनेत सहा पटीने अधिक घरपट्टीची मागणी पाहता देशात व राज्यात लोककल्याणकारी राज्य अस्तित्वात नसल्याचे दिसून येत असल्याची नाराजी यावेळी नागरिक समस्या निवारण मंचाचे अध्यक्ष शैलेश पालकर यांनी नाराजी व्यक्त करुन दुप्पट कर आकारणी महापालिका नगरपालिका नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियमाच्या विरोधात असल्याचे निक्षून सांगितले. शैक्षणिक कर आकारणी आणि अतिरिक्त कर कमी केल्यास नागरिकांना घरपट्टीचे ओझे हलके झाल्यासारखे वाटेल, असे यावेळी मंचाचे कार्यकारिणी सदस्य नितीन म.शेठ यांनी सांगितले.
याप्रसंगी विरोधी गटनेते नगरसेवक दिलीप भागवत यांनी मुख्याधिकाऱ्यांनी योग्य भूमिका न घेतल्याने नगरसेवकांची दिशाभूल झाली असून सुरुवातीला वाढीव घरपट्टीचे सर्वच नगरसेवकांनी समर्थन केले आणि जनतेच्या आंदोलनानंतर सर्वच नगरसेवकांनी विरोधात ठराव केल्याची माहिती दिली. यावेळी नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव सभागृहात मांडल्यानंतर त्या ठरावाला नगरसेवकांच्याच विरोध होण्याची आवश्यकता होती, अशी स्पष्टोक्ती आ.अनिकेत तटकरे यांनी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात ठराव मंजूर करण्यात आल्यास घरपट्टी वाढीसंदर्भात नागरिकांना दिलासा मिळू शकेल, अशी भूमिका विरोधी गटनेते नगरसेवक दिलीप भागवत यांनी मांडली.
याप्रसंगी युवा नेते श्रीयश जगताप व जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख, अजय सलागरे, तालुका अध्यक्ष विठोबा पार्टे, सनी विचारे, समीर चिपळूणकर, भाई पाटेकर यांच्यासह नगरसेविका श्रावणी शहा, गरुड, आशा गायकवाड, गणेश घाटे, स्वप्नील भुवड तसेच, दीपक उतेकर, सचिन गायकवाड वकील व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.