वाकण–पाली मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. पावसामुळे हे खड्डे पाण्याने भरल्याने दिसत नाहीत, परिणामी बाईकस्वार रात्रीच्या वेळी थेट खड्ड्यात आपटत असून अनेक अपघात घडत आहेत. विशेषतः बलाप गावाजवळ, तामसोली स्टॉप शेजारील मोठा खड्डा, तामसोली–राबगावच्या मध्ये पडलेला खड्डा आणि पालीतील आंबा नदीवरील पूल हे भाग विशेष धोकादायक झाले आहेत.
महत्वाचे म्हणजे वाकण–पाली रस्त्याचे काम पूर्ण होऊन अवघे वर्षभरच झाले असतानाही रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यावरून ठेकेदाराच्या कामाच्या निकृष्ट दर्जाचा अंदाज येतो. रस्त्यावर ५ ते १० इंच खोल खड्डे पडले असून, नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. पावसात हे खड्डे अधिकच धोकादायक झाले आहेत.
रात्री अपघातांमध्ये वाढ झाली असून, याची जबाबदारी नेमकी कोण घेणार? असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत. महामार्ग प्राधिकरण व स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार का? आणि झोपी गेलेले प्रशासन जागे होणार का? हे पाहणे गरजेचे आहे.