वरंध भोर घाटाच्या पडझड व दुरूस्तीचा ‘मेगाब्लॉक’; कापडे-कामथे-पुणे घाटाच्या निर्मितीसाठी प्रयत्न होणं गरजेचं

Kamathe Road Poladpur
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
म्हाप्रळ वरंध भोर पंढरपूर रस्त्यावरील भोर घाटातील सततची पडझड आणि बांधकामासाठी तब्बल दोन महिन्यांचा मेगाब्लॉक घेण्याच्या सरकारी प्रवृत्तीमुळे भोर घाटाला ताम्हाणी आणि महाबळेश्वर आंबेनळी घाटाचे दोन लगतचे पर्यायी मार्ग आणि त्यांचा वापर केल्यावर लाखो लोकांना कोटयवधी खर्चाचा नाहक भुर्दंड होत असल्याने पोलादपूर तालुक्यामध्ये याचा पर्याय निर्माण होण्याची आवश्यकता भासत आहे.
पोलादपूर तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कापडे ते कामथे रस्त्याचे काम 6 वर्षापूर्वीच पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच पावसाळयात रस्त्याची दूरवस्था झाली. आता जागोजागी हा रस्ता उखडला असताना त्याची दुरूस्ती ठेकेदाराच्या अनामत रक्कमेतून करण्याच्या नोटीसा संबंधित ठेकेदारास प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांनी बजावल्या आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर येत्या काही वर्षांमध्ये राज्य व केंद्रसरकारच्या माध्यमातून पोलादपूर कापडे कामथे पुणे घाटाची स्वप्नपूर्ती 2021 सालापर्यंत शक्य असल्याची माहिती माहितीचा अधिकार कार्यकर्ते रमेश मालुसरे यांनी दिली होती. मात्र, राज्यसरकार नेहमीच कोसळणाऱ्या वरंध घाटावर सातत्याने खर्च करीत असल्याने नवीन घाटाची निर्मिती करण्याकडे सपशेल दूर्लक्ष झाल्याचे आरटीआय कार्यकर्ते रमेश मालुसरे यांनी खेदपूर्वक मत व्यक्त केले आहे.
12 वर्षांपूर्वी कापडे कामथे या रस्त्यावरून पितळवाडीपर्यंत नेताना गर्भवती महिला रस्त्यातील खड्डयांमुळे वाहनातच बाळंतीण होत असत तर कधी आजारी माणसं उपचाराला नेताना वाटेतच मयत होत असत आणि मोटारसायकली, बैलगाडयांची चाकं, एस.टी.च्या गाडया नादुरूस्त होण्याचे प्रकार नेहमीचेच ठरले होते, असा अनुभव सांगणारे रमेश मालुसरे यांनी आपल्या पाठपुराव्यानंतर आता तब्बल तीन वेळा कोटयवधी रूपये खर्च होऊनही निकृष्ट कामामुळे हिच अवस्था ओढवणार असल्यास पुढील कामथे घाटाच्या पाठपुराव्यात यश येऊनही ते दृष्टीपथाआड जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईत नोकरी करून गावी चिखली येथे भाडोत्री वाहनाने येताना कापडे रस्त्यावरील खड्डयांमुळे नादुरूस्त झालेल्या वाहनामध्ये तब्बल दहा तासांहून अधिक काळ अडकल्याने 16 नोव्हेंबर 2002 पासून कापडे कामथे रस्त्यासाठी पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा करणारे रमेश मालुसरे यांना 2005 नंतर माहितीचा अधिकाराचा आधार मिळाला. त्यामुळे या रस्त्याच्या कामाबाबत पाठपुरावा करण्याचे सामान्य माणसाचे प्रयत्न असामान्य ठरू लागले आहे.
या कापडे ते कामथे रस्त्यामुळे कापडे बुद्रुकच्या 12 वाडया, वाकणच्या 12 वाडया, साखर, आडावळे बुद्रुक, मोरसडे, बोरघर, कामथे या सात गावांचा थेट तर रानवडी, घागरकोंड, बोरावळे, नाणेघोळ, केवनाळे, बोरज, उमरठ, चांदके, ढवळे, आडावळे खुर्द, चिखली, सडे, नावाळे, वडघर, चांदले, साळवीकोंड, गोवेले, खांडज, देवळे, हळदुळे,  दाभिळ, लहुळसे व करंजे ही 23 गावे अशी 30 गावांची 19 हजारांहून अधिक लोकसंख्या मूळ रस्त्याला जोडली गेली आहे. त्यामुळे तालुक्याच्या अर्ध्याअधिक लोकसंख्येला मिळालेला हा रस्ता केवळ तालुक्याच्या किंवा बाजाराच्या गावापर्यंत पोहोचविण्यापुरताच न राहता पुणे जिल्ह्याला जोडण्यात यावा आणि येथील शेतीमाल विक्री तसेच सुशिक्षितांना पुणे शहर परिसरामध्ये रोजगार संधी मिळावी, या अपेक्षेने रमेश मालुसरे यांनी माहितीच्या अधिकारामध्ये 2010 पासून केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन कामथे घाटाचा समावेश करण्यात येऊन 2001 ते 2021 पर्यंतच्या यादीमध्ये कामथे ते पुणे जिल्हाहद्द रस्ता क्र. 166 असा प्रस्तावित करण्यात आला आहे.
अलिकडेच, सातत्याने वरंध घाटाची पडझड होत असताना राज्यसरकार याच घाटाच्या दुरूस्तीवर अधिक भर देत असून वरंध घाटरस्त्यावर ग्रामपंचायत कनेक्टिव्हीटीसाठी अंडरग्राऊंड ऑप्टीकल फायबर केबल टाकण्याचे काम दरीबाजूच्या साईडपट्टीवरून झाल्यामुळे सातत्याने ही वरंध भोर घाटाची पडझड होत राहणार असल्याची लक्षण दिसून येत आहेत. या पडझड आणि दुरूस्तीच्या कामांमुळे वरंध भोर घाटामध्ये तब्बल 2 महिन्यांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हा घाट दोन महिने बंद राहिल्यामुळे माणगांव, निजामपूर, ताम्हिणी घाट आणि पोलादपूर महाबळेश्वर वाई ते पुणे बंगलोर दु्रतगती महामार्ग या पर्यायांचा अवलंब करून लाखो प्रवाशांचे कोटयवधी रूपये नाहक खर्च होऊन वेळेचाही अपव्यय होत आहे. यामुळे पोलादपूर, कापडे ते कामथे हा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता सक्षम बनविण्यासाठी अलिकडेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला असून सर्व पुलांचे बांधकाम नव्याने करण्याची निविदादेखील निघाली आहे. कामथे ते पुणे या जिल्हाहद्द रस्ता क्र. 166चे कामदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जोडूनच सुरू केल्यास पोलादपूर तालुक्यातूनच अल्पावधीमध्ये पुणे जिल्हाहद्दीपर्यंत नवीन रस्ता अस्तित्वात येण्याचे नियोजन आरटीआय कार्यकर्ते रमेश मालुसरे यांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालील सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी 2021 पर्यंत पूर्तता करण्यासाठी दिले होते.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कापडे ते कामथे हा रस्ता उखडला असताना त्याची सक्षमतेने दुरूस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता वर्ग झाला असल्याने शक्य असून त्यापुढील पोलादपूर कापडे कामथे पुणे घाटाची स्वप्नपूर्ती 2021 सालापर्यंत शक्य आहे, असा विश्वास रमेश मालुसरे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *