वडखळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे वय अंदाजे ५३ वर्षे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
माहितीनुसार, संबंधित महिला फिरस्ती स्वरूपाची होती. ती परिसरात भटकंती करत असून मिळेल ते अन्न खाऊन आपला उदरनिर्वाह करत होती. काही दिवसांपासून ती याच परिसरात वावरत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
प्राथमिक अंदाजानुसार, सदर महिलेला एखादा जुनाट आजार असावा आणि त्यातून निर्माण झालेल्या अशक्तपणामुळे तिचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वडखळ पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्ही. पी. म्हात्रे करीत आहेत.