मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत डोलवी परिसरात अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर वडखळ पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजासह एका आरोपीला अटक केली आहे. या धडक मोहिमेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या तत्पर कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
दिनांक 2 मे 2026 रोजी रात्री सुमारे 10.20 वाजण्याच्या सुमारास JSW गोवा गेटसमोरील हायवे लगत असलेल्या चिकन दुकानांच्या परिसरात पोलिसांनी सापळा रचला होता. या कारवाईदरम्यान आरोपी राजा जुमराती मिया अली (वय 30), सध्या रा. डोलवी, गोवा गेट समोरील वसंत नथुराम मोकल यांच्या चाळीत, ता. पेण, जि. रायगड, मूळ रा. बंसंतपूर, ता. चैनपुर, जि. मुजफ्फरपूर, राज्य बिहार याला गांजा विक्रीसाठी येत असताना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याकडून सुमारे 33,300 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 47/2026 अन्वये एनडीपीएस अॅक्ट 1985 च्या कलम 8(क) व 20(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार म्हणून पोलीस कर्मचारी कुंडलिक मधुकर बांगर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस उप अधीक्षक जालिंदर नारकुल यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश ढेणे, प्रशांत देसाई, रुपेश कोंडे तसेच पोलीस शिपाई आकाश कुथे, रामनाथ ठाकूर व बांगर यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
दरम्यान, पेण तालुक्यात अमली पदार्थांच्या विळख्यात वाढ होत असल्याची चर्चा असताना पोलिसांनी वेळेवर कारवाई करत अवैध व्यापारावर आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय म्हात्रे करीत आहेत.