वटपौर्णिमेच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पेण शहरातील काही फळ विक्रेत्यांकडून केळी, जांभूळ करवंद, फणस,आब्यासह इतर फळांची अवाजवी दराने विक्री करून ग्राहकांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप महिला ग्राहक वर्गातून करण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक रस्त्यालगत जमिनीवर फळांची विक्री होत असल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला असून संबंधित प्रशासनाने तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी पूजा विधीसाठी विविध फळांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. या वाढलेल्या मागणीचा फायदा घेत पेण शहरातील काही फळ विक्रेत्यांनी फळांचे दर अचानक आणि अवाजवी वाढवल्याचा आरोप ग्राहक, विशेषतः महिला वर्गाकडून केला जात आहे.
महिलांच्या म्हणण्यानुसार, सणाच्या दिवशी ग्राहकांची गरज ओळखून काही विक्रेते नेहमीच्या तुलनेत अधिक दर आकारत असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. यासोबतच संबंधित विक्रेता दुकानाबाहेर सार्वजनिक रस्त्यालगत जमिनीवर केळी व इतर फळे ठेवून विक्री करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. रस्त्याच्या कडेला जमिनीवर ठेवण्यात आलेल्या फळांवर धूळ, घाण तसेच वाहनांमधून होणारे प्रदूषण याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
याशिवाय संबंधित फळ विक्रेत्याकडे अन्न व औषध प्रशासन (FDA) अथवा स्थानिक नगरपालिकेचा आवश्यक परवाना आहे की नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आवश्यक परवान्याविना फळ विक्री होत असल्यास संबंधित यंत्रणांनी त्याची चौकशी करून नियमांनुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. महिला वर्गाने प्रशासनाकडे सार्वजनिक ठिकाणी विक्री होणाऱ्या अन्नपदार्थांची स्वच्छता, अन्नसुरक्षा नियमांचे पालन, तसेच सणासुदीच्या काळात होणाऱ्या अवाजवी दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी संबंधित प्रशासनाने तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अन्नसुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही याची तपासणी करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.