रोहा नगरीतील कुंडलिका नदी संवर्धन येथे दिनांक २० ते २२ एप्रिल दरम्यान ‘वरदायी कीर्तन अमृत महोत्सव’ पार पडला. वरदा तटकरे यांच्या ६१व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात रोहा नगरी तीन दिवस टाळ मृदुंगाच्या गजरात दुमदुमली. भक्ती रसात रोहेकर तल्लीन झाले.
खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, आणि वरदा तटकरे यांनी स्वतः हरिपाठात व कीर्तन कार्यक्रमात भाग घेत टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तीचा आनंद लुटला. कार्यक्रमात फुगडी, गौळणी, हरिपाठ, व कीर्तनांच्या माध्यमातून भक्तीमय वातावरण निर्माण झाले.
या भव्य कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, गायनाचार्य व मृदुंगमणी यांनी आपली सेवा अर्पण केली. विशेषतः गायनाचार्य हभप नारायण महाराज खिल्लारी यांचा सुमधुर स्वर आणि मृदंगाचार्य हभप विकास महाराज बेलुकर यांच्या वादनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आमदार अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली रोहा तालुका वारकरी संप्रदायाने केले होते. भोजन, महाप्रसाद आणि व्यवस्थापनाच्या माध्यमातून कुठलाही गैरसोयीचा अनुभव न देता हजारो भाविकांनी भक्तीरसाचा आनंद घेतला.
कार्यक्रमात तालुक्यातील ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदुंग मणी यांचा सन्मान करण्यात आला. यासोबतच टाळ, वीणा, व पखवाज वाद्य भेट देऊन दहा पंचक्रोशीतील वारकरी मंडळींचाही गौरव करण्यात आला.
हा कीर्तन महोत्सव रोहा नगरीसाठी अभूतपूर्व ठरला असून भविष्यात वारकरी परंपरेचे संवर्धन करण्यासाठी एक आदर्श ठरू शकतो.