रोहा तालुक्यात लाचखोरीचा पर्दाफाश ! तलाठी फिरोज मुजावर १० हजारची लाच घेताना रंगेहात अटक, नागरिकांमध्ये संतापाची लाट!

Firoz mujavar acb arrested
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
रोहा तालुक्यात सरकारी भ्रष्टाचाराचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. भालगाव येथील तलाठी फिरोज मुजावर याला १०,००० रुपयांची लाच घेताना नवी मुंबई अँटी करप्शन विभागाने रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई 6 मे 2025 रोजी पोलीस उप अधीक्षक नितीन दळवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
तक्रारीनुसार, मोजे कांडणे येथील शेतजमिनीवरील वारस नोंदसाठी अर्जदाराने कायदेशीर अर्ज केला होता. मात्र, तलाठी फेरोज मुजावर याने या सरकारी कामासाठी तब्बल १५,००० रुपयांची लाच मागितली. त्यातील ५,००० रुपये आधीच गुगल पे द्वारे घेतले गेले होते. उर्वरित १०,००० रुपये घेताना सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
या सापळा कारवाईत नितीन पवार, गिरासे, योगीराज नाईक, दिपाली सावंत, योगिता चाळके आणि पोलीस हवालदार रतन गायकवाड यांचा सहभाग होता. पंचसाक्षीदारांच्या उपस्थितीत ही धडक कारवाई यशस्वी झाली.
या घटनेने रोह्यातील सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल कर्मचारी, पोलीस अधिकारी – सर्वच स्तरांवर लाच मागण्याचे प्रमाण वाढले आहे. सातबारा, फेरफार, वारस नोंद, शेतमजुरी, पाणीपुरवठा, पोलिसांत तक्रार नोंदवणे – कोणतेही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही.
“हे एक पकडले गेले, आता बाकीच्यांना शोधा आणि जेलमध्ये टाका!” – असा संतप्त सूर नागरिकांमध्ये उमटत आहे. सामान्य माणसाचं जगणं अवघड झालं आहे, आणि सरकारी कार्यालयं आता जनतेसाठी न राहता अधिकाऱ्यांच्या खाजगी वसुलीची ठिकाणं बनली आहेत.
तलाठी फेरोज मुजावरवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु असून, अजून किती अधिकारी या भ्रष्ट जाळ्यात अडकले आहेत, याची धास्ती नागरिक घेत आहेत.
सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून आता सर्व विभागांचं ऑडिट आणि तत्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरते आहे.
🟠 ही फक्त सुरुवात आहे… रोह्यातील लाचखोरीचं संपूर्ण जाळं उघडकीस येण्यासाठी अजून किती वेळ लागणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *