रोहा तहसील कार्यालयावर पत्रकारांचा आक्रमक मोर्चा — सामान्यांच्या न्यायासाठी प्रशासनाला जाब

Roha patrakar
कोलाड :
पारदर्शकता, सामान्यांसाठीची प्रामाणिकता नसल्याचा चोहोबाजूने आरोप होत असलेल्या रोहा तहसील प्रशासनाविरोधात रोह्यातील सर्व पत्रकार गुरुवारी ५ जून रोजी एकवटले. पुरवठा विभागातील अरेरावी, शालेय दाखले, भातशेती नुकसान पंचनामा प्रक्रीया विविध सामान्यांच्या प्रश्नांसाठी पत्रकारांनी आक्रमक पवित्रा घेत थेट तहसील कार्यालयावर धडक दिली.
विविध शालेय दाखल्यांसाठी अडवणूक केली जाते, उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तलाठी वेळेवर भेटत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे मिळतात. सामान्यांना हेलपाटे मारायला लावून अक्षरशः वेठीस धरतात, पाल्य व पालकांना प्रचंड या गोष्टींचा मनस्ताप सहन करावा लागतो. दाखल्यांच्या प्रक्रियेत अडथळे का, रास्तभाव धान्य दुकानदारांना ८० टक्केच धान्य पुरवठा होतो. १०० टक्के धान्य पुरवठाची नोंद होते. मग २० टक्के धान्य जातो कुठे, रेशन कार्ड बदलून मिळत नाहीत, पुरवठा अधिकारी सामान्यांशी बेशिस्त वागतात, उन्हाळी भातशेती नुकसान भरपाईचे पंचनामे प्रक्रिया अपूर्ण आहे. कृषी विभागावरच सर्व भार टाकून मोकळे होतात. प्रशासनात पारदर्शकता नाही, प्रामाणिकता नाही असा प्रश्नांचा भाडीमार करत पत्रकारांनी तहसीलदार किशोर देशमुख यांना जाब विचारल्याचा प्रसंग घडल्याने शहर, तालुक्यातील सामान्यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, सामान्यांचे प्रश्न ऐकून घेत तहसीलदार किशोर देशमुख यांनी तांत्रिक अडचणी विस्तृत केल्या. पुरवठा विभागाबाबतच्या तक्रारी गांभीर्याने घेतो, शेतीच्या नुकसान पंचनामा प्रक्रीया सुरू आहे. उत्पन्नाचा दाखला यांसह अन्य दाखल्यांचे विलंब, धान्य पुरवठा प्रक्रीया, लोकांच्या विविध अडचणी समजून घेऊन तक्रारींची योग्य ती सोडवणूक केली जाईल असे स्पष्ट आश्वासन तहसीलदार किशोर देशमुख यांनी पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांना दिले तर प्रशासनात पारदर्शकता सामान्यांसाठीची प्रामाणिकता न आल्यास प्रशासनाविरोधात आंदोलन उभे केले जाईल असा गर्भित ईशारा रोहा प्रेस क्लबने दिला आहे.
रोहा तहसील प्रशासन सामान्यांसाठीचा राहिला नाही. रेशन कार्ड प्रक्रीयासाठी जाणीवपूर्वक अडवणूक केली जाते. विभक्त कुटुंबाला स्वतंत्र रेशन कार्ड दिले जात नाही. लोकांना हेलपाटे मारायला लावतात. पुरवठा महिला अधिकारी सामान्यांना चुकीची वागणूक देतात, उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तलाठी फे-या मारायला लावतात. भातशेती नुकसान पंचनाम्याबाबत गांभीर्याता नाही. सामान्यांच्या विविध मागण्यांसाठी पत्रकारांनी गुरुवारी तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी रोहा क्लबचे अध्यक्ष सुहास खरीविले, राजेंद्र जाधव, रवींद्र कान्हेकर, महेंद्र मोरे, श्याम लोखंडे, भाजपाचे उपाध्यक्ष शैलेश रावकर, स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे हाजी कोठारी, वैभव कुलकर्णी, नितीश सकपाळ, सागर जैन, जितेंद्र जाधव, अंजुम शेटे व पत्रकार तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पुरवठा विभागातील अनागोंद कारभारावर पत्रकार कमालीचे आक्रमक झाले. रास्त धान्य तांदळात मोठ्या प्रमाणात तुकडा येत आहे, ८० टक्के धान्यच पुरवठा होतो, मग २० टक्के धान्य जातो कुठे? यावर सखोल माहिती घेतली जाईल, असे सांगत असे होत नाही अशी सबब तहसीलदार किशोर देशमुख यांनी दिली. पुरवठा महिला अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत खूप तक्रारी आहेत, त्यांना समज दिली जाईल, जीर्ण रेशन कार्ड बदलून दिले जातील, कंपनी निवृत्त कर्मचाऱ्यांचे सफेद कार्डचे केशरी कार्ड करुन मिळावीत, आरोग्य उपचारासाठी उपयोगी पडतील. याबाबतही कार्यवाही केली जाईल असे देशमुख यांनी स्पष्ट केले. उत्पन्नाचे दाखले जलद देण्याच्या सूचना संबंधीत तलाठींना केल्या जातील, असे सांगत सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानने शिबीर लावावे असे तहसीलदार यांनी सुचित केले. सामान्यांच्या अडचणी समजून घेवून तशा पद्धतीच्या सूचना संबधीत अधिकाऱ्यांना दिल्या जातील, अडचणीची सोडवणूक केली जाईल अशी स्पष्टता तहसीलदार किशोर देशमुख यांनी व्यक्त केल्याने प्रशासनात कितपत पारदर्शकता येते, सामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होते ? हे लवकरच समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *