
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
अतिपाऊसानंतर अचानक हवामानातील बदलामुळे भात पिकावर रोग व कीड प्रादुर्भाव अन्नद्रव्यांचे कमतरता दिसत असून कुडपण खुर्द येथे काही प्रमाणात निळे भुंगेरे किड व सुक्ष्म अन्नद्रव्ये कमतरता आढळून आल्या होत्या. त्याअनुषंगाने उपविभागीय कृषी अधिकारी जितेंद्र रणवरे यांचे उपस्थितीत तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली क्रॉपसॅप अंतर्गत रोग व कीड व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन कुडपण खुर्द येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी जितेंद्र रणवरे, तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील, कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे, कृषी सहायक मनोज जाधव, संग्राम साळुंखे, माजी सरपंच हनुमंत शेलार, मंगेश चिकणे प्रमुख मार्गदर्शक कृषी प्रगतशील शेतकरी ज्ञानोबा शेलार, ग्रामपंचायत सदस्य महादेव शेलार, शिवाजी शेलार आदी उपस्थित होते.
पोलादपूर तालुक्यात भात पिकावर निळे भुंगेरे या किडीचा प्रादुर्भाव मागील तीन-चार वर्षांपासून दिसून येत आहे. दापोली कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी कार्यालय पोलादपूर ह्या किडीविषयी गावोगावी जनजागृती चे कार्यक्रम करत असून देशभर दुय्यम समजली जाणारी निळे भुगेरे ही कीड पोलादपूर तालुक्यातील काही गावांची डोकेदुखी ठरत आहे.
प्रतिबंधक उपाययोजने मध्ये हि निळे भुंगेरे कीड भात पिकानंतर बांधावरील गवतावर आणि भाताच्या फुटव्यांवर उपजीविका करते आणि पुढील हंगामात भात पिकास उपद्रव करते. त्यासाठी भात लागवडीनंतर बांध स्वच्छ ठेवावेत. शेतात पाणी जास्त काळ न साठता निचरा होईल याची काळजी घ्यावी, असे मत उपविभागीय कृषी अधिकारी जितेंद्र रणवरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
निळे भुंगेरे ही कीड भात पीक फुटव्याच्या अवस्था आणि पसवण्यापूर्वी होतो. पाणथळ जमीन आणि नत्रयुक्त खताच्या अतिरिक्त वापरामुळे या किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे ही काळाची गरज असल्याचे मत तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांनी केले. कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे यांनी तपकिरी तुडतुडे, लष्करी अळी प्रतिबंधक उपाय योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक मनोज जाधव यांनी फवारणी स्प्रेयर पंपाद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. साई हायटेक एॅग्रो एजन्सी द्वारे ग्रामस्थांना बॅटरी ऑॅपरेटर पंप मोफत देण्यात आला.
Related