मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता; ठाणे सत्र न्यायालयाचा मोठा निकाल

मुंबई | विशेष प्रतिनिधी 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 2008 मधील रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात अखेर निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. रेल्वे भरतीदरम्यान मनसेकडून करण्यात आलेल्या आंदोलनात प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात ठाणे सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी राज ठाकरे यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
2008 मध्ये कल्याण, दादर, अंधेरी, डोंबिवली आदी रेल्वे स्थानकांवर रेल्वे भरती परीक्षेसाठी बिहार आणि उत्तर प्रदेशातून आलेल्या उमेदवारांवर मनसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप होता. परीक्षार्थींना मारहाण, प्रश्नपत्रिका फाडणे, दगडफेक, तोडफोड तसेच रेल्वे मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. या घटनांपूर्वी राज ठाकरे यांनी रेल्वे भरतीत मराठी तरुणांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत आंदोलनाची भूमिका घेतली होती.
या प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर आयपीसी कलम 153, 153(A), दंगल, मारहाण आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. 20 ऑक्टोबर 2008 रोजी त्यांना रत्नागिरीतून अटक करण्यात आली होती. मात्र सुनावणीदरम्यान “मी घटनास्थळी उपस्थित नव्हतो आणि माझ्यावरचे आरोप खोटे आहेत,” असे सांगत त्यांनी सर्व आरोप फेटाळले. सरकारी पक्षाकडून ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने अखेर राज ठाकरेसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.