खालापूर तालुक्यातील पोखरवाडी येथे असलेल्या धावडी नदीच्या बंधार्यावरील सांडव्यात पोहण्याचा आनंद घेणारे मुंबई येथील रिझवी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सदरच्या अपघाताची माहिती मिळताच खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे,उपविभाग उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व पोलीस कर्मचारी तसेच अपघातग्रस्त या सामाजिक संघटनेचे सदस्य घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन चारही विद्यार्थ्यांना पाण्याबाहेर काढण्यात यशस्वी झाले मात्र यापैकी तीन विद्यार्थ्यांचा पाण्यातच मृत्यू झाला होता एक विद्यार्थी अत्यवस्थ असल्याची माहिती मिळत होती मात्र तो सुद्धा मृत्यू झाल्याने एकूण चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
खालापूर तालुक्यात पावसाळी पर्यटनासाठी दरवर्षी अनेक पर्यटक येत असतात. यंदा मुंबईतल्या रिझवी कॉलेजचे एकूण ३७ विद्यार्थी पर्यटनासाठी आले होते यामध्ये १७ मुली होत्या.सोंडाई किल्ल्यावर हे सर्वजण ट्रेकिंगसाठी आले होते. तेथून धावडी नदीच्या बंधाऱ्यावरिल सांडव्यात डुंबण्याचा आनंद घेत असताना ही दुर्दैवी घटना घडली.
एकलव्य सिंग, ईशांत यादव,आकाश माने,रणत बंडा अशी मृत युवकांची नावे आहेत. या सर्वांचे शव चौक प्राथमिक आरोग्य केंद्रात आणली आहेत.
अपघाताची माहिती मिळताच खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे आणि कर्मचारी यांचे मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य आणि पोखरवाडीतील स्थानिक युवकांनी या ऑपरेशन मध्ये सहभाग झाले होते.