रायगड : निकालाचं अंदाज चक्र गतिमान ! खा.तटकरे पुन्हा की अनंत गीतेंचं पुनरागमन

Sunil & Geete
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
रायगडचे खासदार केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री स्वर्गीय बॅ.अंतुले आणि रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खा.अनंत गीते पुनर्रचित रायगड लोकसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता निर्माण झाली आणि संसदेमध्ये मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याबाबत बॅ.अंतुले यांच्या मतावर तेव्हाच्या भाजपप्रणित एनडीएचे घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे उपनेते खा.गीते यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि संसदेपासून पुनर्रचित रायगड लोकसभा मतदार संघापर्यंत आक्षेपाचे मोहोळ उठवून बॅ.अंतुले यांना पराभूत करण्यापर्यंत खा.अनंत गीते यशस्वी ठरले होते.
आतादेखील शिवसेनेतील फूट आणि खा.तटकरे यांना महाविकास आघाडीतून महाविकास आघाडीच्या निवडून आलेले खासदार म्हणून प्राधान्यक्रम असताना गीतेंना पराभूत उमेदवार अशी उमेदवारीच्या प्राधान्यक्रमातून बाजूला होऊनही खा.तटकरे यांच्या महायुतीमध्ये सहभागामुळे गीते यांना पुन्हा मिळालेली इंडिया आघाडीच्या उमेदवारीची संधी या सर्व पार्श्वभुमीवर गीते यांनी शिंदे गटाला ढालतलवार चिन्ह असल्यापासून शिवसैनिकांना संघटीत करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल चिन्हापर्यंत पुनरूज्जीवित करणारे ठरले
दुसरीकडे एनडीएचा घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस घडयाळ चिन्ह असूनही खा.तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून रायगड लोकसभा मतदार संघात संघटना बांधणी करण्यास मिळालेला अपुरा अवधी यामुळे प्रचारात ‘सुसरबाई तुझी पाठ मऊ’ म्हणत सहकारी पक्षांच्या कलाने निवडणुकीचा प्रचार करण्याची अपरिहार्यता निर्माण झाली. यामुळे रायगड लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री असलेल्या उमेदवाराचा पुढील लोकसभा निवडणुकीत पराभव होतो, यानुसार गीते यांचा पराभव करून तटकरे खासदार झाले आहे. पण जर केंद्रीय मंत्री राहिलेले पराभूत झाले तर त्यापुढील लोकसभा निवडणुकीत पुनरागमन करतात,  बॅ.अंतुले यांच्यासाठी कुलाबा लोकसभा मतदार संघाने निर्माण केलेल्या अघोषित परंपरेचे रायगड लोकसभा मतदार संघातही पुनरागमन झाल्यास 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनंत गीते यांना पुनरागमनाची संधी मिळते अथवा कसे, हे पाहण्यासाठी हा लेखप्रपंच आहे.
खा.सुनील तटकरे यांना निवडून देण्यासाठी प्रयत्न करणारे प्रत्येक विधानसभा मतदार संघातील नेतृत्व हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची सुरूवात करीत असल्याचे दिसून येत होते. याखेरिज, केंद्रामध्ये पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सज्ज असलेले भाजपचे कार्यकर्ते आणि आपआपल्या नेत्याला आमदार बनविण्यासाठी प्रचाराला लागलेले शिवसेनेचे कार्यकर्ते या गदारोळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद पवार पक्षातही विभागलेले दिसून आल्याने संघटनात्मक बांधणीला अवधी न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी प्रभावी ठरण्यासाठी सहयोगी पक्षांची उत्स्फूर्त अनूकुल भुमिका स्विकारून प्रचार करण्याचा खा.तटकरे यांचा पवित्रा राजकीयदृष्टया परिपक्वतेचे लक्षण ठरले. यामुळे खा.तटकरे यांचे आव्हान सर्वच विधानसभा मतदार संघांमध्ये कायम राहिले आहे.
194-महाड विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 84 हजार 386 मतदार असून त्यापैकी 1 लाख 63 हजार 696 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये खा.तटकरे यांना शिवसेना आ.भरत गोगावले यांचा व युवासेना नेते विकास गोगावले यांचा सुरूवातीला झालेला विरोध तसेच निवडणुकीच्या प्रचारामध्ये लाभलेला हिरिरीने सहभाग हा आश्चर्यजनक असूनही मतदारांना अनुकूल करण्यासाठी उपयुक्त ठरला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे भाजपाचे कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खा.तटकरे यांच्या विजयासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करताना दिसून येत होते.
दुसरीकडे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद पवार पक्षाचे नाममात्र अस्तित्व असताना शेतकरी कामगार पक्षाचीही थोडीथोडकी साथ अनंत गीते यांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत लाभल्याचे दिसून आले. मात्र, शिवसेनेतील फूटीनंतर अनंत गीते हे तातडीने या मतदार संघात सक्रीय राहिले आणि या मतदार संघातील दिवंगत स्व.माणिक जगताप या काँग्रेस नेत्यांचे कुटूंबिय आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्या प्रवेशानंतर नव्याने शिवसेनेमध्ये सहभागी झालेल्या जगताप कुटूंबियांच्या सहकार्याने शिंदे गटासोबतचा संघर्ष कायम ठेवला. खा.तटकरे यांना महाड विधानसभा मतदार संघातून 40 हजारांचे मताधिक्य देण्यासाठी शिवसेनेचा भाजपसोबतच्या प्रचारातून शब्द आहे. मात्र, येथील मतदानाचा टक्का घसरल्याने यात त्याप्रमाणातच घट दिसून येणार आहे. राज्याच्या अस्थिरतेच्या आणि तटकरे विरूध्द शिवसेना संघर्षाच्या महाड केंद्रबिंदूचे रूपांतर खा.तटकरे यांच्या मताधिक्यासाठी झाल्याचे अनोखे उदाहरण येथे राजकीय समीक्षकांना चक्रावून सोडणार आहे.
192-अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 97 हजार 396 मतदार असून त्यापैकी 1 लाख 98 हजार 289 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शिवसेना आ.महेंद्र दळवी यांच्यासह रिपाइं भाजपाचे मतदार खा. सुनील तटकरे यांना किती मते देतील, असा प्रश्न असून या अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये अनंत गीते यांची उमेदवारी इंडिया आघाडीचे निमंत्रक शेकापक्षाचे आ. भाई जयंत पाटील यांनी मागून घेतली आणि अलिबागमध्येही शेकापक्षासोबत काँग्रेस, कुणबी आणि मुस्लीम अशी बांधणी करून मोठया मताधिक्याची बेगमी केली असल्याने रायगड लोकसभा मतदार संघातील सर्वाधिक मताधिक्य गीते यांना या मतदार संघातून मिळणार आहे.
191-पेण विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 3 लाख 3 हजार 308 इतके मतदार असून 1 लाख 95 हजार 653 मतदारांनी मतदान केले. भाजपाचे आ.रवीशेठ पाटील आणि लोकसभेचे इच्छुक भाजप उमेदवार धैर्यशील पाटील अशा भाजपगडाला खा.तटकरे यांच्या प्रचारात सक्रीय व्हावे लागले. या मतदार संघात भाजपप्रवेशाआधी धैर्यशीलदादांना शेकापक्षाचे उमेदवार म्हणून भाजपचे रवीशेठ पाटील यांनी पराभूत केले होते. मात्र, त्यानंतरही शेकापक्षाचे अस्तित्व कायम ठेवण्यात आ.जयंतभाई पाटील यांनी यशस्वी प्रयत्न केल्यानंतर स्थानिक नेते शिशिरदादा धारकर यांचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश याठिकाणी निर्णायक ठरला आणि अनंत गीते यांना आव्हान कायम ठेवण्याची संधी मिळाली.
193- श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 62 हजार 266 मतदार असून त्यापैकी 1 लाख 55 हजार 254 मतदारांनी मतदान केले. मंत्री अदिती तटकरे यांचा हा मतदार संघ असून या विधानसभा मतदार संघात अवधूत तटकरे, तुकाराम सुर्वे, रेहाना उंड्रे, रवींद्र राऊत, श्याम सावंत आणि स्वत: सुनील तटकरे यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. खा.तटकरे यांना मानणाऱ्या मतदार संघात रायगड जिल्हा बँकेच्या शाखेच्या उदघाटनावेळीच शेकापक्षाचे आ.जयंतभाई पाटील यांनी शरदश्चंद्र पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत अनंत गीते यांची उमेदवारी मागून घेतली आणि राजकीय खेळीत सरशी केल्याची चर्चा होऊ लागली. मात्र, या विधानसभेची रचना काँग्रेसची पार्श्वभूमी असूनही राजकीय स्थित्यंतरामध्ये शिवसेनेला 2 वेळा संधी मिळाल्याचे दिसून येत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने 3 वेळा संधी मिळवली आहे. यावेळी अदिती तटकरे यांच्याप्रमाणे हा मतदार संघ खा.तटकरे यांना प्रभावी मताधिक्य देण्याची चिन्हे येथील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याने कमी दिसत आहे. मात्र, हा मतदार संघ खा.तटकरे यांचाच वरचष्मा कायम ठेवणार आहे.
रायगड लोकसभा मतदार संघातील रायगड जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघांच्या शक्यतांवर विचार केल्यावर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि खेड विधानसभा मतदार संघातील मताधिक्याबाबत चर्चा करताना अनंत गीते हे महाड विधानसभा मतदार संघाप्रमाणेच यंदा नवव्यांदा या भागातील उमेदवार आहेत, हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे.
263-दापोली विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 80 हजार 261 मतदार असून त्यापैकी 1 लाख 60 हजार 798 मतदारांनी मतदान केले. या विधानसभा मतदार संघाच्या राजकीय चुलींचा विचार केला तर मंडणगड आणि खेड विधानसभा एकत्र होऊन दापोली विधानसभा मतदार संघ झाल्याने आ.योगेश कदम, वैभव खेडेकर, सुर्यकांत दळवी आणि संजय कदम या प्रमुख नेत्यांच्या राजकीय भुमिकांवर आणि थेट मुस्लीम, बौध्द व कुणबी समाजाच्या मतदारांवर मताधिक्याची भिस्त दिसून येते. यावेळी खा.तटकरे यांच्यासाठी अनंत गीते यांचे आव्हान फारसे महत्वाचे दिसून येत नसले तरी अनंत गीते यांना मतदारांची नस न् नस माहिती असल्याप्रमाणे त्यांचा प्रभाव सर्वत्रच दिसून येत होता. यामुळे हा मतदार संघ कोणत्या अनपेक्षितपणे मताधिक्य देण्याची शक्यता निर्माण करणार आहे. हे जाणवत आहे.
264-गुहागर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 40 हजार 755 मतदार असून त्यापैकी 1 लाख 35 हजार 877 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जर भास्कर जाधव सोबत आहेत तर गुहागर विधानसभा मतदार संघात कोणीही विरोधक नाहीत,शिवसेनेचे आ.भास्कर जाधव यांच्यावर अनंत गीते यांनी दाखविलेला विश्वास पाहता याठिकाणी मागील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सहदेव बेटकरांची उमेदवारी होण्याआधी बेटकरांनी गीतेंविरोधात केलेले तटकरे यांच्या खासदारकीला अनूकूल काम यंदा होणार नसल्याची गीते यांना खात्री असल्याचे द्योतक आहे. भाजपचे माजी आ.डॉ.विनय नातू यांचा प्रभाव गीते यांच्या मताधिक्याला कोठेही बाधा पोहोचविणार नसल्याचीही या विधानामध्ये विश्वासार्हता दिसून येते.
एकंदरित, रायगड लोकसभा मतदार संघाच्या सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदारांनी इव्हीएममध्ये बंद केले असले तरी मतदानोत्तर अंदाजचक्रांमध्ये अनेक मुद्दे चर्चेत येत हे अंदाजचक्र गतिमान होऊ लागले आहे. दोन सुनील तटकरे आणि तीन अनंत गीते या उमेदवारांसोबत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार चव्हाण यांचेही अस्तित्व निकालामध्ये प्रकर्षाने दिसून येणार आहे. मात्र, अंदर की बात है…तीन एमएलए हमारे साथ है। ही टॅगलाईन धमाल उडवून देत असताना त्यातील सत्यता मात्र कोठेही दिसून येत नव्हती.
मतदान कशासाठी करायचे याबाबत सर्वसामान्यांमध्ये स्वत:ची मते तयार करण्यात राजकीय पक्षांना स्वारस्य नसल्याचे दिसून आले. चाकरमानी मतदारांना मतदानासाठी कोकणात आणण्याचे स्वारस्यही राजकीय पक्षांनी दाखविले नसल्याने यंदा निव्वळ कोकणातील मतदारांनी मात्र, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूट, मोदीना पुन्हा पंतप्रधान करणे, संविधानबदलाची शक्यता तसेच भ्रष्टाचाराचा मुद्दा स्वत:हून स्विकारले होते. आता फक्त मतमोजणीअंती निकालापर्यंत अंदाजचक्र गतिमान राहणार असल्याने लोकसभा 2024 निवडणुकीचे पर्व संपताना रायगड रत्नागिरीतील मतदार विचारमंथनातून कोणती भुमिका फेकून देणार आणि कोणती रत्न संसदेमध्ये पाठविणार हे त्यावेळीच स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *