रायगड जिल्ह्यात पत्रकार संवाद यात्रेद्वारे पत्रकारांच्या सन्मानाची भूमिका

Sunil Tatkare
 निवृत्त न्यायाधीश मार्कडेय काटजू यांनी पत्रकार हे गर्दीचा भाग नसून लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याने पत्रकारांवरील हल्ले आणि पोलीस तसेच प्रशासनाची पत्रकारांप्रती भूमिका याबाबत कडक निर्देश देऊनही पत्रकारांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचे ठिकठिकाणी झालेल्या घटनांतून स्पष्ट झाले आहे. यामुळे पत्रकारांच्या सन्मानाची मागणी आता पत्रकारांकडूनच होण्याची परिस्थिती सार्वत्रिकरित्या निर्माण होणे स्वाभाविक झाले आहे. ठिकठिकाणी पत्रकारांचा अपमान करण्यामार्गे पत्रकारांचेच आपसात हाडवैर आणि संघटनात्मक स्पर्धेचे वातावरण दिसून येत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईतर्फे नागपूर येथील दीक्षाभूमीपासून मुंबईतील मंत्रालयापर्यंत सुरू असलेल्या पत्रकार संवाद यात्रेचे स्वागत रायगड जिल्ह्यामध्ये येत्या 19 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात येणार आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीत अभिवादन करून रविवार, दि.28 जुलै रोजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संवाद यात्रेला सुरुवात झाली यानंतर वर्धा, अमरावती, अकोला, शेगाव, मुक्ताईनगर, जळगाव, धुळे, नाशिक आणि पहिल्या टप्प्याचा समारोप शिर्डी येथे 3 ऑॅगस्ट झाला. दुसरा टप्पा सोमवार, दि. 5 ऑगस्टरोजी छत्रपती संभाजीनगर येथून सुरू झाला असून यानंतर बीड, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, सातारा, बारामती, पुणेमार्गे पत्रकार संवाद यात्रेचे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर 19 ऑगस्ट 2024 रोजी खोपोली शिळफाटा येथील शिवस्मारकाला अभिवादन करून त्यानंतर अष्टविनायक श्रीक्षेत्र महड येथील वरदविनायकाला नमन करून यानंतर खालापूर येथील शिवस्मारक आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करून या पत्रकार संवाद यात्रेचे स्वागत होणार आहे.
यानंतर दांडफाटा येथील नवसाला पावणारी आई टाकेदेवीच्या मंदिरामध्ये नतमस्तक होऊन पत्रकारांसाठी वरदान मागितले जाणार आहे. यानंतर आजिवली येथे राजकीय पदाधिकारी व पत्रकारांकडून संवाद यात्रेचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या जाणार आहे. यानतर दुपारी पनवेल एस.टी.स्थानकासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयाला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात येणार असून या स्वागतसोहळयानंतर लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहामध्ये दि. 19 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 300 पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत भव्य पत्रकार परिषद सुरू होणार आहे. पनवेल येथील मुक्कामानंतर दुसऱ्या दिवशी ठाणे आणि त्यानंतर दि. 20 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मंत्रालयामध्ये ही पत्रकार संवाद यात्रा पोहोचणार आहे.

Patrakar Sanvad Yatra

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयामध्ये प्रमुख पत्रकार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि ना.अजितदादा पवार यांना निवेदन देऊन विविध मागण्या करण्यात येणार आहेत. यानंतर यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये या पत्रकार संवाद यात्रेचा समारोप होणार आहे. या पत्रकार संवाद यात्रेदरम्यान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबईमार्फत विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणाऱ्या नागरिकांना उत्पन्न करामध्ये वार्षिक 5 हजार  रूपयांची सवलत द्यावी. ज्यामुळे वृत्तपत्र व्यवसायाला स्थैर्य प्राप्त होईल.
  • सरकारने वृत्तपत्रात प्रसिध्द होणा जाहिरातीवरील 5 टक्के जीएसटी कर रद्द करावा.
  • महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतींना वार्षिक आराखडयात वृत्तपत्र खरेदीसाठी 10 हजार रुपये तरतूद करावी.
  • बाळशास्त्री जांभेकर निवृत्ती योजनेतील सलग तीस वर्षे सेवेची जाचक अट रद्द करावी.
  • अधिस्विकृती पत्रिका ग्रामीण भागातील पत्रकारांना मिळावी यासाठी प्रक्रिया सुलभ करावी.
  • विशेषत: ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी वेतन पावतीची अट रद्द करावी. बहुतांशी पत्रकार मानधनावर काम करतात.
  • पत्रकार संरक्षण कायद्याची स्थानिक पातळीवर अमलबजावणी करण्यासाठी पोलिस प्रशासनाला आदेश द्यावेत.
  • राज्यात पत्रकारांसाठी शासकीय जमीन म्हाडाला देवून जिल्हा व तालुका स्तरावर स्वतंत्र घरकुल योजना राबवावी.
  • अधिस्विकृती समितीवर कामगार कायदा (लेबर युनियन ऍक्ट 1926)अंतर्गत नोंद असलेल्या संघटनांना प्रतिनिधीत्व द्यावे. 
  • राज्य, जिल्हा, तालुका शासकीय समित्यांवर स्थानिक पत्रकारांचा एक प्रतिनिधी घ्यावा.
  • भारतीय राज्य घटनेतील तरतूदीप्रमाणे राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभेत, राज्यपालनियुक्त विधानपरिषदेत पत्रकारांमधून प्रतिनिधित्व द्यावे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्विकृत सदस्य म्हणून स्थानिक पत्रकारांतून प्रतिनिधीत्व द्यावे.
  • अधिस्विकृतीधारक पत्रकारांना रेल्वे, विमान, स्लिपर कोच, बस प्रवासात सवलत द्यावी.
  • अधिस्विकृतीधारक पत्रकारांच्या वाहनांना महामार्गावर टोलमाफी द्यावी.
  • पत्रकारांच्या पाल्यांना उच्च व परदेशी शिक्षणासाठी विशेष सवलत द्यावी.
  • शासकीय जाहिरातींचे दरात महागाईच्या तुलनेत दर दोन वर्षांनी वाढ करावी.
  • न्युज पोर्टल, युटयूब चॅनेल आदी डिजीटल मिडीयाला निकष ठरवून शासनमान्यता द्यावी.
  • शासकीय जाहिराती देताना समान न्यायाच्या सुत्राने यादीवरील दैनिके, साप्ताहिक यांना देण्यात याव्यात.
  • वर्गवारीच्या नावाखाली जिल्हा, तालुकास्तरीय दैनिके व साप्ताहिकांवर होणारा अन्याय थांबवावा. तसेच महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी शासनाच्या आदेशानुसार सर्व दैनिके व साप्ताहिकांना चक्राकार पध्दतीने जाहिराती द्याव्यात. यासाठी स्वतंत्र आदेश द्यावा.
  • 25 वर्षे पूर्ण केलेल्या दैनिक व साप्ताहिकांना द्विवार्षिक पडताळणीतून वगळावे.
  • वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील वाढते कंत्राटीकरण थांबवण्यासाठी शासनाने स्वतंत्र समिती नेमावी.
  • पत्रकारांची गणना करून त्यांना शासकीय लाभ देण्याचा निर्णय घ्यावा.
  • मतदारसंघ पुर्नरचनेत शिक्षक पदवीधर यांच्याप्रमाणे पत्रकारांसाठीही स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करावा.
  • अशा मागण्यांचा समावेश आहे.
या पत्रकार संवाद यात्रेत राज्यभरातील पत्रकार, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे जेष्ठ नेते, पदाधिकारी सहभागी होत आहेत. राज्यभर सर्वाधिक सदस्य संख्या असलेली एकमेव संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली यात्रा सुरू झाली आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी, पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी हे ब्रीद घेवून संवाद यात्रा 24 जिल्ह्याच्या ठिकाणी आणि दिडशेपेक्षा अधिक तालुक्याच्या ठिकाणाहून मार्गस्थ होत आहे. महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नाला फोडण्यासाठी आणि थेट जनतेशी संवाद साधुन समर्थन मिळवण्यात येत आहे.
…शैलेश पालकर
   अध्यक्ष, रायगड जिल्हा, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *