रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आमदार भरत गोगावले यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल दोन-अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पालकमंत्रीपदाची माळ भरत गोगावले यांच्या गळ्यात पडल्यानंतर त्यांचे रायगडमध्ये आगमन होताच कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.
मुंबईहून रायगडकडे येत असताना पनवेल-पळस्पा फाटा येथून अलिबागपर्यंत ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या स्वागत सोहळ्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, विभागप्रमुख, महिला आघाडी, युवती पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर भरत गोगावले प्रथमच रायगडमध्ये दाखल होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. ठिकठिकाणी त्यांचे फुलांच्या वर्षावाने आणि घोषणांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
पिता-पुत्रांची भावनिक गळाभेट अलिबागमध्ये भरत गोगावले यांचे आगमन झाल्यानंतर त्यांच्या स्वागताचा आणखी एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. पुत्र विकास गोगावले यांनी वडील भरत गोगावले यांची गळाभेट घेतली. यावेळी आनंदाच्या भरात विकास गोगावले यांनी वडिलांना उचलून घेतले. पिता-पुत्रांमधील हा भावनिक क्षण उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.
पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर भरत गोगावले यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात रायगडच्या विकासासाठी त्यांच्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.