रामधरणेश्वर तलावात बुडून २६ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू; अलिबागमध्ये हळहळ

रामधरणेश्वर तलावात बुडून २६ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू
रायगड | अमुलकुमार जैन
अलिबाग तालुक्यातील रामधरणेश्वर येथील तलावात फिरण्यासाठी गेलेल्या २६ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (५ ऑगस्ट) सकाळी घडली. निहार विजय शेट्टी (रा. मेटपाडा, अलिबाग) असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
रामधरणेश्वर येथे मित्र-मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी गेलेला निहार विजय शेट्टी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास तलावात उतरला असता त्याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात बुडाला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच त्याचा भाऊ साहिल शेट्टी व कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र तोपर्यंत निहारचा मृत्यू झाला होता. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
घटनेची माहिती परिसरात पसरताच जिल्हा रुग्णालयात नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली. पदवीधर असलेला निहार खासगी नोकरी करत असून शांत, मनमिळावू आणि मदतीस तत्पर युवक म्हणून परिचित होता. त्याच्या अकाली निधनाने मेटपाडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पावसाळ्यात तलाव, नदी व धबधब्यांमध्ये उतरताना नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.