रात्रीस खेळ चाले; भुताटकी की भानामती… नागोठण्याची स्वागत कमान एका रात्रीत गायब?

नागोठणे | महेंद्र माने
नागोठणे शहराच्या वेशीवर उभारलेली सिमेंट काँक्रीटची भव्य स्वागत कमान एका रात्रीत गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागोठणेकरांना मोठा धक्का बसला असून ‘भुताटकी की भानामती’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जनतेच्या पैशातून उभारलेल्या कमानीवर काळोखात बुलडोझर चालवणाऱ्या समाजकंटकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच इतकी मोठी घटना घडूनही ग्रामविकास अधिकारी गप्प का, पोलिसात तक्रार का दाखल करण्यात आली नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
नागोठणे ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून शहरात तीन सिमेंट काँक्रीट स्वागत कमानी उभारल्या होत्या. त्यापैकी सरकारी दवाखान्याजवळील कमान रस्ता रुंदीकरणामुळे आधीच तोडण्यात आली होती. उर्वरित कमानींपैकी एसटी स्थानकाजवळील एक आणि मुंबई-गोवा महामार्गावरून रिलायन्स कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुसरी कमान अस्तित्वात होती. मात्र या दुसऱ्या कमानीवर काही अज्ञात समाजकंटकांनी बुलडोझर चालवून एका रात्रीत ती पाडून टाकली. कमानीचा मलबा रस्त्याच्या बाजूला टाकून देण्यात आला असून ग्रामपंचायत प्रशासनाची शांत भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
दरम्यान, नागोठणे परिसरात रिलायन्स कंपनीच्या मोठ्या प्रकल्पाचे विस्तारीकरण सुरू असून दररोज मोठे ट्रक आणि ट्रेलर या मार्गावरून ये-जा करत आहेत. या पार्श्वभूमीवर कमान अडथळा ठरत होती का? सुपारी देऊनच कमान पाडण्यात आली का? असा सवाल भाजपचे रोहा तालुका क्रीडा संयोजक शेखर गोळे यांनी उपस्थित केला आहे. ग्रामपंचायतीची संपत्ती असलेली ही कमान गायब झाल्यानंतरही प्रशासन शांत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
.