मोदी–मॅक्रॉन मुंबई भेटीत महाराष्ट्राच्या अस्सल चवींचा खास पाहुणचार


 
अमुलकुमार जैन | 
भारत-फ्रान्स संबंधांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई भेटीत राजनैतिक चर्चांसोबतच महाराष्ट्राच्या अस्सल खाद्यसंस्कृतीचीही झलक पाहायला मिळाली. औपचारिक बैठकींच्या वातावरणात लोकभवनात सादर करण्यात आलेल्या खास मराठी मेन्यूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मुंबईची ओळख असलेला वडा पाव आणि तिखट-चटकदार मिसळ पाव शिष्टमंडळासाठी वाढण्यात आला. तसेच भरड धान्यांना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणाशी सुसंगत धाराशिव जिल्ह्यातील डोमगावचा ताजा ज्वारीचा हुरडा विशेष ठेवण्यात आला. स्थानिक शेतकरी आणि ग्रामीण परंपरेचा सन्मान करणारा हा निर्णय प्रतीकात्मकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
डहाणूचा नैसर्गिक चिकू, पालघर जिल्ह्यातील जाम आणि कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील ठाकपुर्ली येथील रंगाविना तयार होणारी बर्फी यांसारख्या गोड पदार्थांनी मेन्यूला अधिक समृद्धता दिली. राजकीय चर्चांबरोबरच सांस्कृतिक देवाणघेवाणीचा सुंदर मिलाफ घडवत ‘स्वादातून संवाद’ साधण्याचा हा प्रयत्न संस्मरणीय ठरल्याची प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त झाली.