मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या ३६ तासांत उलगडा; आरोपी वाहनासह जेरबंद

मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या ३६ तासांत उलगडा; आरोपी वाहनासह जेरबंद
रेवदंडा | सचिन मयेकर 
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या ३६ तासांत छडा लावत ओडिशा राज्यातील एका आरोपीला चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सीसीटीव्ही फुटेज, बिनतारी संदेश आणि महामार्गावरील नाकाबंदीच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे खानाव (ता. अलिबाग) येथील जितेश भास्कर पाटील (वय ३३) यांनी १६ जुलै २०२६ रोजी रात्री ११ वाजता त्यांची TVS Ntorq 125 (क्रमांक MH-06-CS-8745) ही मोटारसायकल घराच्या अंगणात उभी केली होती. मात्र, १७ जुलै रोजी पहाटे सुमारे १.२८ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने ती चोरी करून नेली. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १०१/२०२६ अन्वये BNS कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभारी अधिकारी सपोनि गडदे यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अंगाज यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक नियुक्त केले.
तपासादरम्यान घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता आरोपी मोटारसायकल घेऊन पेण–पनवेल मार्गाने जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षामार्फत वाहतूक शाखांना तातडीने बिनतारी संदेश देण्यात आला. महामार्ग वाहतूक पोलीस केंद्र पळस्पे यांच्या सहकार्याने नाकाबंदी करण्यात आली. या कारवाईत पोलीस हवालदार मनीष ठाकूर, तुषार पारवे, पोलीस नाईक केदारनाथ साखरकर आणि पोलीस शिपाई समीर धुरी यांनी आरोपी शंकर मंगल गिलवा (वय ३३, रा. चम्पागड, ता. राऊरकेला, जि. सुंदरगड, ओडिशा) याला चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात यश मिळवले. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनीष ठाकूर करीत आहेत.