मुरुड तालुक्यातील राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कोर्लई (उसरोली) जिल्हा परिषद मतदारसंघात आयोजित आढावा बैठकीदरम्यान माजी सभापती, ग्रामपंचायत उपसरपंच तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. या घडामोडीमुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडल्याचे चित्र आहे.
आगामी कार्यनियोजन, संघटन बळकटी आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने ही आढावा बैठक आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय राजा केणी यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीत मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीत रमेश उर्फ बाबू नागावकर व त्यांच्या पत्नी ज्योती रमेश नागावकर, भोईघर ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रसाद चौलकर यांच्यासह माजी सभापती, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या पक्षप्रवेशामुळे मुरुड तालुक्यात शिवसेनेची ताकद अधिक मजबूत झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या आढावा बैठकीस शिवसेनेचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, महिला आघाडी, युवा सेना तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीमुळे संघटनात्मक बांधणीला नवे बळ मिळाल्याचे यावेळी स्पष्टपणे दिसून आले.