‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ शिबिराचं खालापूरात आयोजन !

Mahendra Tharave

खोपोली ( हनुमंत मोरे ) : 

सर्व सामान्य महिलेचा सन्मान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न हे सरकार करीत असुन बचत गटाचे अनुदान वाढविण्याचे काम देखील याच सरकारने केले आहे, असे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खालापूर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना व महसूल पंधरवडा – २०२४ हा संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शन करताना केले. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना व महसूल पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार महेन्द्र थोरवे यांनी केले.
खालापूर पंचायत समिती येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. खालापूर तालुक्यात ३१ ऑगस्ट पर्यंत जवळपास २८ हजार महिलांनी लाडक्या बहिण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी केली आहे. गुरुवारी पंचायत समिती सभागृह खालापूर येथे आयोजित कार्यक्रमासाठी आमदार महेंद्र थोरवे ,खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी ,पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप कराड, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रवीण पाटील, तालुका आरोग्य अधिकारी कल्याणी इंगोले यांच्यासह अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर, बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना तळागाळातील महिलांकरता असून या योजनेसाठी पात्र कोणतीही महिला लाभापासून वंचित राहू नये यासाठी गटविकास अधिकारी, तहसीलदार तसेच सर्व प्रशासकीय कर्मचारी घेत असलेल्या मेहनतीचे थोरवे यांनी कौतुक केले. सरकार गेल्यावर योजना बंद होणार अशा विरोधक पसरवत असलेल्या खोट्या अफवाना बळी न पडता पुन्हा महायुतीचे सरकार येऊन ही योजना सुरू राहिल असा विश्वास आमदार थोरवे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकात्मिक बाल विकास अधिकारी प्रवीण पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन उमेश विचारे यांनी केले. कार्यक्रमासाठी शेकडोच्या संख्येने महिला वर्गाची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *