मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष यशवंत मोने यांच्या पत्नीचे निधन

मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष यशवंत मोने यांच्या पत्नीचे निधन
पेण :
ज्येष्ठ पत्रकार तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष कै यशवंत मोने (नाना मोने) यांची पत्नी उषाताई तथा ‘नानी’ यशवंत मोने यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दिनांक १८ रोजी दु:खद निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. 
 शांत, सुसंस्कृत, खंबीर, हसमुख व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्या मुळच्या मराठवाड्याच्या शिक्षणाचे महत्व त्यांना असल्याने त्यांनी अनेक महिलांना शिक्षणाकरिता प्रवृत्त केले होते. महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या संघर्षमय वाटचालीतील एक मूक पण बळकट साथीला आणि अनेक लेखक, नेते, संपादक, सामाजिक कार्यकर्त्यांना आधार देणाऱ्या ‘नानी’ला अखेरचा निरोप  देण्यात आला. 
१९६५ च्या भारत-पाक युद्धात नाना मोने अमृतसर सीमेवर वार्तांकनासाठी गेले होते, त्या काळात संपूर्ण शहरात ब्लॅक आउट असताना, उषाताईंनी मेणबत्तीच्या दिव्याच्या उजेडात युद्धाच्या बातम्या नोंदवल्या होत्या ही आठवण आज अनेकांच्या स्मरणात आहे.
माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले, शंकरराव चव्हाण, बाळासाहेब विखे पाटील, गोपीनाथ मुंडे, मीनाक्षीताई पाटील , साहित्यिक अरुण साधू,  यांच्यासह अनेक थोर व्यक्ती त्यांच्या घरी ‘नाना-नानीं’च्या भेटीसाठी वारंवार येत असत. 
त्यांच्या अंत्ययात्रेला समित म्हात्रे, संजय मोहिते, संतोष राऊत, राजेश प्रधान, विणा शेवडे, अशोक पवार, समीर साने, विजय चोणकर, निलेश जोशी, सुनील रामधरणे, चेतन रामधरणे, एसटी महामंडळातील कर्मचारीवर्ग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नाना मोने यांचे सुपुत्र संदीप, सून हर्षदा यांना राधाकृष्ण विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, यांच्यासह अनेक मान्यवरांनी संपर्क साधून संवेदना व्यक्त केल्या आहेत. उषाताईंच्या निधनाने नंतर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *