मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेवर 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण वाहतूक कोंडीनंतर अखेर वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तब्बल 1.2 लाख प्रवाशांना सुमारे 5.16 कोटी रुपयांचा टोल परतावा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा परतावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मार्फत दिला जाणार असून, येत्या काही दिवसांत संबंधित वाहनचालकांच्या FASTag खात्यांमध्ये थेट जमा केला जाणार आहे.
3 फेब्रुवारी रोजी खोपोली परिसरात गॅस टँकरचा अपघात झाल्यानंतर एक्स्प्रेस वेवर तसेच जवळील पुणे–बंगळुरू महामार्ग मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल 32 तासांपेक्षा अधिक काळ वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. हजारो प्रवासी अडकून पडले होते. अनेकांना पाणी, अन्न आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव सहन करावा लागला.
अपघातानंतर प्रशासनाने तातडीने टोल वसुली थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र तोपर्यंत काही वाहनधारकांच्या FASTag खात्यांतून टोलची रक्कम वजा झाली होती. याच व्यवहारांची पडताळणी करून ती रक्कम परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. MSRDC च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, आदेश दिल्यानंतरही ज्या वाहनधारकांकडून टोल वसूल झाला आहे, त्यांना पूर्ण परतावा दिला जाईल.
टोल वसुली करणाऱ्या IRB Infrastructure Developers या कंत्राटदार कंपनीकडून FASTag व्यवहारांचा तपशील मागवण्यात आला होता. टोल नाक्यांवरील बॅरिअर्स पूर्णपणे उघडण्यापूर्वी काही व्यवहार आपोआप प्रक्रिया झाले असण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा सर्व व्यवहारांचा डेटा तपासून संबंधित प्रवाशांना पैसे परत केले जाणार आहेत.
या घटनेनंतर टोल परताव्याची मागणी जोर धरत होती. आता 1.2 लाख प्रवाशांना 5 कोटींहून अधिक रक्कम परत मिळणार असल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.