मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला ‘छ.शिवाजी महाराज राष्ट्रीय महामार्ग 66’ नांव देण्याची कोकण प्रादेशिक पक्षातर्फे महामार्गावर बॅनर्स लावून मागणी

Kokan Paksha
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
कोकण प्रादेशिक पक्षातर्फे 18 फेब्रुवारीपासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत हजारो फ्लेक्स बॅनर्स लावून ‘छ.शिवाजी महाराज राष्ट्रीय महामार्ग 66’ असे नांव देण्याची मागणी करण्यात आल्याने या पक्षाच्या आगामी भुमिकेकडे कोकणवासियांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कोकणाच्या समस्या वेगळया असल्याने लोकसभेच्या 12 जागा लढविणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष ऍड.ओवेस पेचकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
कोकणाचे प्रश्न हे महाराष्ट्र राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांच्या तुलनेमध्ये वेगळे असून कोकणातील विकासाचा दृष्टीकोनही वेगळा असण्याची गरज आहे, हे ओळखून चिपळूण येथील प्रख्यात हायकोर्ट वकील ऍड.ओवेस पेचकर यांनी कोकण प्रादेशिक पक्षाची स्थापना केली आहे. मुंबई महानगर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि कोकणाच्या सीमावर्ती भागाशी संबंधित लोकसभा मतदार संघातील 12 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे यावेळी कोकण प्रादेशिक पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ऍड.ओवेस पेचकर यांनी सांगितले.
कोकणातील आर्थिक प्रगती, शोषणविरहित राज्याची निर्मिती, नैसर्गिक साधनसंपत्तीवर सामाजिक नियंत्रण, खासगी उद्योग आणि व्यवसायांना प्रोत्साहन, परदेशी गुंतवणूक आणि पूर्ण सहभागाबाबत स्वागताची भुमिका असलेल्या कोकण प्रादेशिक पक्षाचे उद्दीष्ट हे मुक्त आणि लोकशाही समाजाची रचना करण्यासोबतच राजकीय, आर्थिक, सामाजिक, रोजगार आणि सांस्कृतिक जीवनपध्दती टिकविण्यासह कोकणाच्या वैशिष्ठयपूर्ण परंपरांचे जतन करण्याचा हेतू असल्याचे यावेळी ऍड. पेचकर म्हणाले.
कोकण प्रादेशिक पक्षाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला छत्रपती शिवाजी यांचे नाव लागावे, ही मागणी केल्याप्रमाणे छ.शिवजयंती उत्सवापूर्वी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर या मागणीचे फलक सर्वत्र जागोजागी लागले. अनेक सामाजिक संस्थांनी व नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दि.19 फेब्रुवारीरोजी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमावेळी मराठा क्रांती मोर्चातर्फेदेखील कोकण प्रादेशिक पक्षाने मागणी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय महामार्ग या नामकरणाला लेखी जाहीर पाठिंबा दिला. यावेळी कोकण प्रादेशिक पक्षाचे संस्थापक संयोजक ऍड.ओवेस पेचकर, तसेच मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी प्रकाशराव देशमुख, दिलिप देसाई, सतीश मोरे, सुबोध सावंत देसाई, मकरंद जाधव, सतीश सावंत देसाई, कपिल शिर्के, संजय बामणे, शशिकांत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *