मुंबई गोवा महामार्गावर लागलेल्या आगीत खाजगी प्रवासी बस जळून खाक, सुदैवानं जीवितहानी टळली

Mahad Fire On Bus
महाड(  मिलिंद माने ) : महाड जवळ मध्यरात्री दोनच्या सुमारास एका खाजगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना घडल्याने बर्निंग बसचा थरार महामार्गावरील प्रवाशांना पहावयास मिळाला. सुदैवाने या आगीत कोणीच जखमी झाले नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे रत्नागिरी येथील हरिश्चंद्र चव्हाण यांच्या मालकीची औदुंबर छाया ट्रॅव्हल्स या कंपनीची गौरव चव्हाण यांच्या मालकीची प्रवासी बस (MH – 08 E 9779) बुधवार ७ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीहून मुंबईकडे निघाली होती. मध्यरात्री 2.30 चे दरम्यान महाडच्या सावित्रीपुला जवळ आली असता तिच्या उजव्या बाजूचा मागील टायर फुटून टायरने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या डाव्या बाजूस उभी करून प्रवाशांना झटपट खाली उतरवले तसेच बसमधील अग्निशमन यंत्रणेमार्फत आग विझवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला, मात्र तोपर्यंत बसने पेट घेतला.
घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या बसमध्ये चालकासह एकूण २२ जण प्रवास करीत होते. प्रवाशांना वेळीच खाली उतरवल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, मात्र या आगीमध्ये बस संपूर्णपणे जळून खाक झाली. दरम्यान या बसमधील सर्व प्रवाशांना अन्य एका बसमधून सुखरूपरित्या मुंबई येथे रवाना करण्यात आले. या संपूर्ण घटनेची माहिती बसचे चालक गुलहसन पठाण यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांमार्फत अधिक तपास सुरू आहे.
समृद्धी महामार्गावर टायर फुटून होणाऱ्या अपघातांच्या घटनांचे उदाहरण समोर असताना आता मुंबई गोवा महामार्गाचे देखील काँक्रिटीकरण झाल्यामुळे येणाऱ्या कालावधीत अशा पद्धतीने टायर फुटीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी शासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत या दुर्घटनेनंतर नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *