माथेरान झाले १७४ वर्षांचे

माथेरान ( मुकुंद रांजाणे ) :
सह्याद्रीच्या पर्वतरांगेत एका कुशीत वसलेले रायगड जिल्ह्यातील एक  प्रदूषण मुक्त असे अद्वितीय पर्यटनस्थळ म्हणून माथेरानचे नाव सध्यातरी जगाच्या नकाशावर प्रकाश झोतात आहे.आज दि.२१ मे रोजी या ठिकाणाला १७४ वर्षे पूर्ण झाली आहेत.
ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सर ह्युज मॅलेट हे त्याकाळी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना चौक गावापासून त्यांना समोर दिसणारा गर्द वनराई असलेला डोंगर भावला होता त्यामुळेच त्यांनी आपला मोर्चा या डोंगराच्या दिशेने वळविला सध्याच्या वन ट्री हिल पॉईंट मार्गाने ते वर आले होते. इथला रमणीय निसर्ग आणि शुद्ध हवा, गर्द झाडी, खळखणारे झरे,निरव शांतता यामुळे सर ह्युज मॅलेट यांनी आपला मुक्काम याठिकाणी काही दिवस केला होता. त्यानंतर त्यांनी इथे एक छोटीसी वास्तू उभारली. डोंगराळ भाग असल्याने फक्त घोडे वाहतूक करत असत म्हणून त्यांनी आपल्या वास्तूचे नाव “द बाईक” असे केले होते.
२१ मे १८५० मध्ये सर ह्युज मॅलेट यांनी माथेरानचा शोध लावला होता त्यानंतर हळूहळू ब्रिटिशांकडे कामे करणाऱ्या पारसी लोकांना मोठमोठे भूखंड देऊन त्याजागेवर पारशी लोकांनी आपले बंगले उभारले.या जंगलात राहण्यासाठी पारशी लोकांचे बंगले सांभाळण्यासाठी रत्नागिरी, सातारा जिल्ह्यातील लोकांना माळी कामगार म्हणून काम दिले होते. सध्याच्या परिस्थितीत अनेक पारशी लोकांनी आपले बंगले विकून मुंबई अथवा परदेशात स्थायिक झालेले आहेत. हे पारशी लोक जरी इथे रहात नसले तरीसुद्धा या स्थळावर आपली हुकूमशाही अबाधित राखण्यासाठी काहींकडून नेहमीच प्रयत्न केला जात आहे. इथल्या विकास कामांना खोडा घालण्यात ही मंडळी आजही अग्रेसर दिसत आहेत त्यामुळे जरी ब्रिटिश हा देश सोडून गेले असले तरी ही मंडळी त्यांच्या पावलावर पाऊल टाकत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
 १९०५ मध्ये केवळ हिलस्टेशन असल्याने या गावाला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात आला आहे.१९०७ मध्ये सर आदमजी पिरभोय आणि अब्दुल हुसेन आदमजी पिरभोय या पितापुत्रांनी नेरळ- माथेरान अशी मिनिट्रेन सेवा स्वखर्चाने त्याकाळी ( सोळा लाख रुपये खर्च करून ) उपलब्ध करून दिल्यामुळे इथे पर्यटकांची संख्या वाढत गेली ती आजमितीपर्यंत वाढतच आहे. जवळपास साठ हॉटेल्स,पाचशे पेक्षाही अधिक लोजिंग त्याचप्रमाणे शासकीय निवासस्थाने पर्यटकांना सेवा देत आहेत. इथल्या स्थानिक लोकांच्या तीन ते चार पिढ्या आजही कष्टदायक कामे करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत आहेत.
सध्याच्या घडीला नगरपरिषदेच्या सभागृहात कुणीही सत्ताधारी गट नसल्याने या गावाचा १७४ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि प्रशासनाला सुध्दा वेळ दिसत नाही ही खरोखरच लाजिरवाणी बाब असल्याचे सूर उमटताना दिसत आहेत.दरवर्षी येथील १९८६ बॅचचे माजी विद्यार्थी न चुकता २१ मे रोजी पेमास्टर उद्यानातील सर ह्युज मॅलेट यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *