माथेरानमध्ये हातरिक्षा चालकांचे बेमुदत उपोषण; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीची मागणी तीव्र

कर्जत | गणेश पवार
माथेरान मधील हाथ रिक्षाच्या माध्यमातून माणूस माणसाला ओढून नेण्याच्या अमानवी प्रते विरोधातील याचीके संदर्भात सर्वोच्च न्यायालयानी दिलेल्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी माथेरान येथील श्रमिक हातरिक्षा चालक मालक संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे पदाधिकारी व सभासद हे प्रशासन व शासन विरोधात सोमवारी २३ मार्च रोजी माथेरान येथील श्रीराम चौकात बेमुदत उपोषणाला बसले आहे. तर संघटनेनी प्रवाशांच्या सोयीसाठी ई-रिक्षा सुरू ठेवण्याचा निर्णय घेत त्या प्रवाशांसाठी सुरू ठेवल्या आहेत. मात्र आज उपोषणाचा दुसरा दिवस सुरू झाला असता, देखील प्रशासन व शासन हे उपोषणकर्त्यांची मागणी सोडविण्यास निष्फळ ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे.
सध्या माथेरानमध्ये एकूण ९४ हातरिक्षा चालक असून, त्यापैकी ७४ रिक्षा अद्याप सुरू आहेत. पायलट प्रकल्पांतर्गत २० चालकांना ई-रिक्षाची परवानगी देण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ई-रिक्षांची संख्या ठरवण्याचा अधिकार नियंत्रण समितीकडे देत गावाची गरज लक्षात घेऊन सर्व चालकांचे पुनर्वसन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या पुनर्वसनाच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, सध्या मंजूर करण्यात आलेल्या २० ई-रिक्षांच्या निर्णयात संघटनेला विश्वासात घ्यावे, प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी, ई-रिक्षासंदर्भातील नियंत्रण समितीची तातडीने बैठक बोलवावी, अशा मागण्या घेऊन उपोषणकर्त्यांनी तीन प्रमुख प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण पुकारले आहे.
उपोषणाचे पहिल्या दिवशी माथेरान गिरिस्थान नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी व नगरसेवक तसेच माथेरान पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरिक्षक सरिता मुसळे यांनी संध्याकाळी साधारण ५.३० वाजण्याचे सुमारास उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्ते यांच्याशी संवाद साधून आम्ही तुमचे प्रश्न हे माथेरान मॉनिटरिंग कमिटीकडे पाठवून लवकरात लवकर संयुक्त बैठकीचे आयोजन करून त्यामध्ये तुमचे प्रश्न सोडविण्यासाठीचा निर्णय घेतला जाईल तसे लेखी पत्र देत प्रशासन स्तरावरून उपोषणकर्यांची समजूत काढत विनंती करण्यात आली. मात्र ही विनंती अमान्य करत उपोषणकर्ते यांनी कर्जत प्रांत यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेऊन आमची व्यथा ऐकावी व आमच्या मागण्या सोडविण्याचे आश्वासन द्यावे. या मागणीवर ठाम राहात आपले उपोषण हे सुरू ठेवले आहे.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवसी उपोषणकर्ते अतिष सावंत यांना १८० असा हाय बीपीचा हाय रिस्कवर त्रास झाला आहे. तर उपोषणकर्ते संतोष लखन, रोशन माथेरानवाला, नगरसेवक केतन रामाणे,अली डोंगरे, दिनेश सुतार यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाला आहे. तसेच उपोषणकर्ते संतोष निचिंदे, उज्वला राणे यांना रक्तदाब खाली आल्याचा त्रास झाला आहे. सदर बाब लक्षात घेता माथेरानचे अधिक्षक सुरेंद्र ठाकुर, पोलीस निरिक्षक सरिता मुसळे व माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढत सदर उपोषण सोडण्याची विनंती केली आहे. तसेच अधिक्षक सुरेंद्र ठाकुर यांनी प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्याशी सदर उपोषण संदर्भात फोन वरून संपर्क करून, माथेरान मॉनिटरिंग कमिटीकडे तुमच्या प्रश्नाचे लेखी पत्र देऊन लवकरात लवकर बैठकीचे आयोजन करून, सदर बैठकीमध्ये तुमच्या मागण्याचे निवारण केले जाईल. अशा अशयाचे लेखी पत्र हे उपोषणकर्ते यांना देण्याचे सुचित केले आहे. मात्र उपोषणकर्ते हे प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ हे आमच्या उपोषणकर्त्यांच्या प्रश्नांचे उपस्थित राहून निरसन करत आमच्या मागण्या मार्गी लावत नाही. तो पर्यंत आमचे उपोषण हे सुरू राहील या निर्णयावर ठाम असल्याने, मात्र आता प्रशासन शासन काय भूमिका घेणार या कडे मात्र सर्वांचे लक्ष लागले असून, उपोषणाच्या दुसऱ्या दिवसी ही उपोषणकर्ते यांच्या मागण्या सोडविण्यास मात्र प्रशासन व शासन निष्फळ ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे.