माथेरानमध्ये महायुतीकडून शिवजयंती उत्साहात साजरी !

Matheran Shivjayanti
माथेरान ( मुकुंद रांजणे ) :
साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीया या पवित्र दिनी तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पहिल्यांदाच महायुतीच्या माध्यमातून या उत्सवात राजकीय पक्षांची मंडळी सहभागी झाली होती.
यापूर्वी फक्त शिवसेनेचे पदाधिकारी हा उत्सव साजरा करण्यात पुढाकार घ्यायचे.
सकाळी दहा वाजता श्रीराम चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी आणि शिवसेनेचे संघटक मनोज खेडकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर साडेअकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेश दळवी आणि भाजपचे अध्यक्ष प्रवीण सकपाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्ध पुतळ्याला सेनेच्या श्रुतिका दाभेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती कुमार यांनी पुष्पहार अर्पण केला तर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्तंभास सेनेचे आदित्य भिल्लारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर जोशी यांनी पुष्पहार अर्पण केला. दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज रोड येथील महाराजांच्या पुतळ्याला गौरंग वाघेला, योगेश शिंदे यांनी पुष्पहार अर्पण केला. सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची आणि घोड्यावर स्वार झालेल्या मावळ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी मावळ पुणे येथील झांज पथक तसेच दांडपट्टा वगैरे खेळांचे आयोजन करण्यात आले होते. फटाक्यांची आतिषबाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी सारा आसमंत आणि वातावरण शिवमय बनले होते शिवशाही अवतरली असल्याचा भास होत असल्याने पर्यटक आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात सर्व शिवशाही बंदिस्त करण्यासाठी सज्ज झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *