माणगाव–गोरेगाव परिसरात जुन्या विहिरीत मानवी सांगाडा आढळल्यानं खळबळ

माणगाव–गोरेगाव परिसरात जुन्या विहिरीत मानवी सांगाडा आढळल्यानं खळबळ
रायगड | अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील चिंचवली ग्रामपंचायत हद्दीत कालव्यालगत असलेल्या जुन्या विहिरीत मानवी सांगाडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विहिरीची साफसफाई आणि दुरुस्तीचे काम सुरू असताना कामगारांना हा सांगाडा दिसून आला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून सांगाडा ताब्यात घेतला असून पुढील तपासासाठी पूरक माहिती संकलित करण्यात येत आहे. सांगाडा किती वर्षांपूर्वीचा आहे आणि तो नेमका कोणाचा आहे, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, ही घटना अपघात, आत्महत्या की घातपाताशी संबंधित आहे, याबाबतही सध्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे माणगाव–गोरेगाव परिसरात भीती आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणाचा अधिक तपास गोरेगाव पोलीस करत आहेत.