बी.आर. चोप्रा निर्मित महाभारत या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेत कर्णाची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेल्या अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. बुधवारी (15 ऑक्टोबर) सकाळी 11.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 69 वर्षांचे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज धीर कर्करोगाने त्रस्त होते. उपचारादरम्यान ते काही काळ बरे झाले होते, मात्र काही महिन्यांपूर्वी पुन्हा आजार परतला. प्रकृती अधिक खालावल्यानंतर त्यांच्यावर सर्जरीही करण्यात आली होती, परंतु त्यातून त्यांना वाचवता आले नाही.
पंकज धीर यांचा जन्म 1956 साली मुंबईत झाला. त्यांनी महाभारत मालिकेत ‘कर्ण’ आणि चंद्रकांता या मालिकेतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. तसेच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही अभिनय केला. त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले.
त्यांचा मुलगा निकितन धीर हा देखील अभिनय क्षेत्रात सक्रिय असून त्याने अभिनेत्री कृतिका सेंगर हिच्याशी विवाह केला आहे. पंकज धीर यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.