पोलादपूर तालुक्यातील सर्वात उंचावरील ‘महादेवाचा मुरा’ या तीर्थक्षेत्रातील स्वयंभू शिवमंदिरात नवसपूर्तीनंतर भाविकांनी बांधलेल्या पितळी आणि पिवळ्या धातूच्या असंख्य घंटयांची चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही घटना गेल्या शुक्रवारी (११ ऑक्टोबर) रात्री घडली असून शनिवारी सकाळी (१२ ऑक्टोबर) ही चोरी उघडकीस आली. या चोरीनंतर पोलादपूर शहरातील लोखंडी पुलाच्या चोरीप्रकरणाची आठवण नागरिकांना झाली आहे.
या प्रकरणी स्थानिक ग्रामस्थांनी सुरुवातीला पोलादपूर पोलिसांना तोंडी माहिती दिली होती, मात्र कार्यवाही न झाल्याने मुंबईस्थित ग्रामस्थांसह महादेवाचा मुरा येथील नागरिक मंगळवारी (१४ ऑक्टोबर) पोलादपूर येथे पोहोचले. त्यांनी पोलादपूर पोलीस ठाणे आणि तहसिलदार कपिल घोरपडे यांना लेखी तक्रार अर्ज देऊन चोरी करणाऱ्याला ताब्यात घेऊन मंदिरातील ऐवज पुन्हा मंदिरात जमा करण्याची विनंती करण्यात आली आहे.
पोलादपूर पोलीस ठाण्यासह पोलादपूर तहसिलदार कपिल घोरपडे यांना दिलेल्या अर्जावर बोरघर सरपंच बंडू विठू पारधी, शिवमंदिराचे पुजारी कोंडीराम गणपत पारधी, अध्यक्ष गोविंद नारायण भगत, मिलींद तुकाराम पवार, चंद्रकांत गंगाराम पवार, संभाजी गणू झुंजार, सखाराम तु.कदम आदी ग्रामस्थांनी स्वाक्षरी केली आहे.
पोलादपूर तालुक्यातील महादेवाचा मुरा या गावाचा पर्यटन विकास करण्यासंदर्भात सर्वात आधी स्व.आ.माणिक जगताप यांनी पावले उचलली होती. त्यानंतर महाविकास आघाडीच्या पर्यटनराज्यमंत्री अदिती तटकरे यांनी महादेवाचा मुरा येथे रस्ता व पुलांची बांधणी करण्याकामी निविदा काढून काम सुरू करण्यास चालना दिली. यानंतर मोटारसायकल व रिक्षांद्वारे पर्यटक महादेवाचा मुरा येथे शिवमंदिराचे दर्शन घेण्यासाठी जाण्यास सुरूवात झाली. ज्या शिवमंदिरामुळे महादेवाचा मुरा लोकवस्तीला पर्यटनाचा क दर्जा प्राप्त झाला त्या शिवमंदिरातील पिंडीवरील आभूषणे आणि असंख्य लहानमोठया आकाराच्या घंटया पुढील पर्यटन विकासापूर्वीच चोरीला गेल्याने या मंदिराचे जाज्वल्य महत्व कमी करण्याच्या हेतूने हा प्रकार झाला अथवा भंगारचोरांनी पाळत ठेऊन चोरी केली असावी अशी शक्यता व्यक्त होत आहे.
या स्वयंभू शिवमंदिरातील सुमारे १५० ते २०० किलो वजनाच्या लहान-मोठ्या घंटया अनेक वर्षांपासून नवसपूर्तीनंतर बांधण्यात आल्या होत्या. काही घंटया पितळ आणि काही किंमती पिवळ्या धातूच्या असल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व कमी करण्याचा प्रयत्न झाला का, अशी चर्चा गावात सुरू आहे. पोलादपूर पोलिसांकडून लवकर कार्यवाही करून या घंटया पुन्हा मंदिरात आणाव्यात, अशी अपेक्षा शिवभक्त व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.