महाड विन्हेरे विभागात ढगफुटीने मलिकार्जुन नदीला पूर

महाड | मिलिंद माने
महाड तालुक्यातील तसेच रायगड–रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरील विन्हेरे विभागातील ताम्हणे देवाचा डोंगर परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसामुळे मलिकार्जुन नदीला अचानक पूर आला. या पुराचे पाणी थेट विन्हेरे गावातील बागआळी परिसरात शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली आणि काही वेळातच बागआळी परिसर जलमय झाला. अचानक आलेल्या पुरामुळे स्थानिकांची धावपळ उडाली, तर परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगली.
स्थानिक रहिवासी बंटी जंगम यांनी सांगितले की, याचप्रमाणे तब्बल १९ वर्षांपूर्वीही ताम्हणे देवाचा डोंगर परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला होता. त्यावेळीही मलिकार्जुन नदीला पूर येऊन बागआळी परिसरात पाणी शिरले होते. जवळपास दोन दशकांनंतर पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.