महाड तालुक्यात ‘कभी खुशी कभी गम’ : ओझर्डेंना हायकोर्ट दिलासा, विरोधक निवडणुकीपासून दूर राहण्याची शक्यता

Ozarde mahad
महाड | विशेष प्रतिनिधी 
महाड तालुक्यातील शिरगाव गावचे सरपंच व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा समन्वयक सोमनाथ दिगंबर ओझर्डे यांच्यासह अक्षय भोसले व प्रतीक जगताप यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून ॲट्रॉसिटी प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. यामुळे येत्या ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत करंजाडी (विन्हेरे) गटातून निवडणूक लढवण्याचा ओझर्डेंचा मार्ग मोकळा झाला आहे. माणगाव सत्र न्यायालयाने यापूर्वी अटकपूर्व जामीन फेटाळला होता.
महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटामध्ये झालेल्या राड्यानंतर परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते. याच प्रकरणात गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात आवाज उठवणाऱ्या सोमनाथ ओझर्डे यांच्यावर शाब्दिक बाचाबाचीनंतर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. ओझर्डेंना जामीन होऊ नये यासाठी विरोधकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या दिलास्यामुळे त्यांची उमेदवारी भक्कम झाली आहे.
दरम्यान, महाड नगरपरिषद निवडणुकीतील राडा प्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे फलोत्पादन मंत्री व महाडचे आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाड तालुका अध्यक्ष निलेश महाडिक व धनंजय उर्फ बंटी देशमुख हे जिल्हा परिषद निवडणुकीपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाड शहर पोलिसांनी निवडणूक अधिकाऱ्यांना फरार आरोपी किंवा त्यांचे प्रतिनिधी अर्ज भरण्यास आल्यास तत्काळ पोलिसांना कळवण्याचे पत्र दिल्याचे समजते. त्यामुळे महाड तालुक्यात शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘कभी खुशी कभी गम’ असे मिश्र वातावरण पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *