महाडमध्ये 30 जुलै मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा संततधार सुरू ठेवल्यामुळे 31 जुलै च्या (शुक्रवारी )पहाटे सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे महाडकरांची झोप उडाली. नेहमीप्रमाणे दस्तुरी नाका ते नातेखिंड या मार्गावर सावित्री नदीचे पाणी आल्याने हा मार्ग दिवसभर बंद ठेवण्यात आला. मात्र अचानकपुर का आला पावसाचे प्रमाण जास्त नसताना महाड तालुक्यातील वरंध व पोलादपूर तालुक्यातील रानबाजीरे या धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने महाडमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली का अशी चर्चा महाडमध्ये ऐकण्यास मिळत असताना शासकीय अधिकारी मात्र याबाबत कोणतीही माहिती देण्यास तयार नाही.
महाड तालुक्यात 30 जुलै च्या मध्यरात्रीपासून चालू झालेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी पहाटे सावित्री नदीला पूर आला. महाड शहराजवळून वाहणाऱ्या सावित्री नदीला आणि गांधारी नदीला पूर आला. धोक्याची पातळी गाठत असल्याने महाड करांमध्ये पहाटे च पडणाऱ्या पावसाची आणि नदीला आलेल्या पुराची चिंता निर्माण झाली. अचानक आलेल्या पुरामुळे शहरामध्ये पुन्हा पाणी येते की काय अशी भीती निर्माण झाली. दस्तुरी नाका ते नातेखिंड या मार्गावर पुराचे पाणी शिरल्याने हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे गांधारी पुलाला लागूनच पाणी वाहत असल्याने या परिसरातील नागरिकांची देखील चिंता वाढल्याचे पाहण्यास मिळाले.
महाड बरोबरच महाबळेश्वर मध्ये देखील पाऊस जोमाने पडत होता. त्यातच सकाळी असलेल्या भरतीचा प्रभाव महाड मधील सावित्री नदीवर देखील जाणवला. अचानक नदीचे पात्र तुडुंब भरून वाहू लागल्याने पाऊस नक्की पडतोय कुठे असा प्रश्न देखील निर्माण झाला. महाबळेश्वर मध्ये दिनांक ३० रोजी १०९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान दुपारनंतर महाड परिसरातील शेताडी मध्ये शिरलेले पाणी आणि दस्तुरी नाका ते रायगड रस्त्यावरील पाणी ओसरायला सुरुवात झाली आणि पाऊस थांबल्याने महाडकरांची चिंता दूर झाली असली तरी मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प असताना सावित्री नदीला आलेले पाणी नेमके कुठून आले याबाबत प्रशासन माहिती देत नसले तरी महाड तालुक्यातील वरंध व पोलादपूर तालुक्यातील रानबाजीरे या धरणामधूनच मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग झाल्याने महाडच्या सावित्री नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाल्याने महाडमध्ये पाणी भरल्याची चर्चा मात्र नागरिकांमधून ऐकण्यास मिळाली एकंदरीत पूरस्थिती हाताळण्यास प्रशासन सज्ज असले तरी नेमके धरणातून पाणी कधी सोडले जाईल याबाबत मात्र नागरिकांना सतर्क राहण्याबाबत प्रशासन का सांगत नाही असा सवाल महाड मधील नागरिक व व्यापारी यांच्याकडून विचारला जात आहे.