महसूल विभाग जनतेचा आधार’; अलिबागमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शेतकरी, महिला व आदिवासींसाठी महत्त्वपूर्ण घोषणांची बरसात

अलिबागमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शेतकरी, महिला व आदिवासींसाठी महत्त्वपूर्ण घोषणांची बरसात
रायगड | अमुलकुमार जैन
महसूल विभाग हा केवळ कर वसूल करणारा विभाग नसून सर्वसामान्यांच्या मालमत्तेचे आणि हक्कांचे संरक्षण करणारा जनतेचा आधार आहे, अशी भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. अलिबाग येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाच्या राज्यस्तरीय समारोप कार्यक्रमात त्यांनी शेतकरी, महिला, आदिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा करत सरकारची लोकाभिमुख भूमिका अधोरेखित केली.
राज्यातील तब्बल दहा लाख लाभार्थ्यांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात आल्याचे सांगताना बावनकुळे यांनी महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जात असल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्यांची कर्जमाफी, कृषीपंपांची वीजबिल माफी, शेतरस्त्यांना गती आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
शेतात प्रत्यक्ष राबणारी महिला ही देखील शेतकरीच असून तिलाही शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक कायदेशीर बदल करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोटहिस्स्याची मोजणी मोफत करून देण्याची घोषणाही त्यांनी केली. रायगड जिल्ह्यात सुमारे ३,९५० शेतरस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर शेतीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरकारी जागांवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची घरे आणि खाजगी जागांवरील जुन्या घरांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी व्यापक सर्वेक्षण करण्यात येणार असून पात्र नागरिकांना मालकी हक्क देण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय आदिवासी वनपट्टाधारकांना हक्क मिळवून देण्यासाठीही सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अभियानाची माहिती देताना २२ जुलैपासून सुरू झालेल्या या उपक्रमातून दोन लाखांहून अधिक नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतल्याचे सांगितले. एक लाख शेतकऱ्यांना सातबारा वाटपाचे काम अंतिम टप्प्यात असून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना पाच हजार दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे. इरसाळवाडी दुर्घटनेतील अनाथ २५ बालकांना आर्थिक मदत देण्यात आली असून शेकडो शेततळी उभारण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. गेल्या दोन वर्षांत रायगड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या किंवा हुंडाबळीची एकही घटना घडली नसल्याचा दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला शुभेच्छा देताना, नागरिकांना विविध सेवा आणि दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे हे अभियान लोकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले.
रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र दळवी, विक्रांत पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांनीही महसूल विभागाच्या लोकाभिमुख कामकाजाचे कौतुक करत शासनाच्या योजना तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमास विविध लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.