भाजीवाहतुकीचा टेम्पो उलटून 1 ठार 3 जखमी

Accident Poladpur1
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला करंजाडी रेल्वे स्थानकापर्यंत जोडण्यासाठी यापुर्वीच्या शिवसेना भाजप युतीसरकारच्या काळातील तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते भुमिपूजन होऊन पूर्णत्वास गेलेल्या काटेतळी नागाव विन्हेरे रस्त्यावर मंगळवारी रात्री अपघात झाल्यानंतर अरूंद रस्त्याच्या रूंदीकरणाची गरज स्पष्ट होऊन या अपघाताने पोलादपूर काटेतळी रस्ता चर्चेत आला आहे. या अपघातात भाजीवाहतुकीचा टेम्पो उलटून 1 ठार 3 जखमी झाल्याची माहिती पोलीसांकडून प्राप्त झाली आहे.
पोलादपूर शहरातील कविंद्र परमानंद स्मारकाच्या उदघाटनावेळी तत्कालीन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते भुमिपूजन होऊन पूर्णत्वास गेलेल्या काटेतळी नागाव विन्हेरे रस्त्याचे रूंदीकरण होऊन मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला करंजाडी रेल्वे स्थानकापर्यंत जोडण्यासाठी प्रयत्न होण्याची मागणी अनेक वर्षांपासून पोलादपूर तालुकावासियांकडून होत असताना या मागणीकडे सपशेल दूर्लक्ष चालले होते. मात्र, मंगळवारी झालेल्या अपघाताने पोलादपूर काटेतळी रस्ता पुन्हा चर्चेत आला आहे.
पोलादपूर नागाव-विन्हेरे रस्त्यावर काटेतळीनजिक भाजीवाहतूक करणारा टेम्पो उलटून एकाचा मृत्यू तर तीनजण जखमी झाल्याची घटना मंगळवार 14 मे रोजी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास घडली आहे.
पोलादपूर पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीकांत विलास पिसाळ (रा.ओझर्डे ता.वाई जि.सातारा) हा आपल्या ताब्यातील अशोक लेलँड टेम्पो (क्रमांक एम एच 11डी डी 9762) यामध्ये वाई येथून भाजीपाला भरून 4 प्रवासी बसवून पोलादपूर बाजूकडून काटेतळी मार्गे विन्हेरे रस्त्याकडे जाताना काटेतळी हद्दीत आला असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून अतिवेगाने, बेपर्र्वाईने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून तीव्र चढाच्या वळणावर आल्यानंतर त्याचा गाडीवरील ताबा सुटून टेम्पो कलंडून होऊन अपघात घडला.
या अपघातात आनंदा अंकुश कारंडे (45, सोमजाईनगर वाई, जि.सातारा)यांचा जागीच मृत्यू झाला तर तुषार लालसिंग भिलारे (वय 28 रा. सोमर्डी, ता. जावळी), राजेंद्र बबन गाडवे (वय 55 रा. गाडवेवाडी, ता.वाई,) सुमन अशोक जमदाडे (वय 50 रा. आधार हॉस्पिटल जवळ हनुमान नगर, वाई) असे तिघेजण जखमी झाले.
या अपघाताची नोंद गुन्हा रजिस्टर 54-2024 भा.दं.वि.स कलम 304(अ),279,337,338, मो.वा.अ.क. 184 प्रमाणे होऊन पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक घुले हे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *