भाजपच्या केंद्रीय संघटनेत मोठे फेरबदल; स्मृती इराणी, राम माधव यांचं पुनरागमन

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, ‘आप’ला मोठा धक्का!

नवी दिल्ली |

आगामी विधानसभा निवडणुका आणि संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजपा) आपल्या केंद्रीय संघटनरचनेत मोठे फेरबदल केले आहेत. पक्षाध्यक्ष नितीन नबीन यांनी जाहीर केलेल्या नव्या टीममध्ये माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी, तर राम माधव यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याकडे राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या फेरबदलात भाजपच्या आयटी सेलमध्येही महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, अमित मालवीय यांची या पदावरून गच्छंती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी छत्तीसगडचे दीपक म्हस्के यांची राष्ट्रीय आयटी सेल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाच्या मीडिया विभागाची जबाबदारी खासदार अनिल बलूनी यांच्याकडे कायम ठेवण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या १३ सदस्यीय यादीत सहा महिला नेत्यांना स्थान देण्यात आले असून, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि दिल्लीच्या नेत्या रेखा वर्मा यांचा त्यात समावेश आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही नवी संघटनात्मक मोर्चेबांधणी महत्त्वाची मानली जात आहे. स्मृती इराणी यांचा प्रशासकीय व राजकीय अनुभव, राम माधव यांचा संघटनात्मक अनुभव आणि वसुंधरा राजे यांचा उत्तर भारतातील प्रभाव यांचा पक्षाला निवडणूक रणनीतीत फायदा होण्याची शक्यता आहे. अनुभवी नेत्यांसोबत नव्या फळीचा समन्वय साधत संघटना अधिक मजबूत करण्याचा नितीन नबीन यांचा हा प्रयत्न आगामी निवडणुकांसाठी ‘मास्टरस्ट्रोक’ ठरतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.