भर दुपारी मुसळधार पाऊसाने माणगांवकरांना झोडपले

Paaus
माणगांव (रविंद्र कुवेसकर) : 
माणगांव तालुक्यात शुक्रवार दिनांक ६ जून रोजी सकाळी ऊन्हाच्या झळांनंतर दुपारी दीडच्या सुमारास अचानक वातावरणात आमूलाग्र बदल झाला. गडद ढगांनी आभाळ भरून आलं आणि विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट यानंतर जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अवघ्या काही तासांतच परिसरात पाणीच पाणी साचून ओलेचिंब स्थिती निर्माण झाली.
या पावसाने काही वेळानंतर विश्रांती घेतली आणि पुन्हा एकदा तापदायक ऊन्हाने दर्शन दिलं. या विचित्र हवामानामुळे नागरिक हैराण झाले असून, पावसाळा खरंच सुरु झालाय की अजून नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये चर्चेला आला आहे.
पारंपरिक अंदाजानुसार पावसाची खरी सुरुवात ७ जूनला होते, तर ८ जूनला मृग नक्षत्र सुरु होत आहे – हे नक्षत्र बळीराजासाठी शेतीच्या कामाची गती वाढविण्याचे संकेत असते. मात्र यंदा मे महिन्यापासूनच झालेला मुसळधार पाऊस जुलै महिन्याचा आभास निर्माण करत आहे. ओढे, नाले, छोटे प्रवाह आणि नदी पात्रे भरून वाहू लागली आहेत.
या असामान्य पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पेरणीची तयारी उधळली असून, पावसाळी शेती ‘रामभरोसे’ झाली आहे. हवामान विभाग आणि कृषी विभागाकडून सततच्या अद्ययावत माहितीकडे लक्ष ठेवावे लागणार आहे. यावर्षीची शेती अनिश्चिततेच्या सावटाखाली असल्याची शंका शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *