भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी शुभेच्छाच; जिल्ह्याचा विकासच महत्त्वाचा – आदिती तटकरे

मुंबई | विशेष प्रतिनिधी 
रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मंत्री आदिती तटकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळाले तरी त्यांना शुभेच्छाच असतील, असे सांगत त्यांनी जिल्ह्याच्या विकासालाच सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले.
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले हे दोघेही या पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा होती. मात्र, या पार्श्वभूमीवर आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर अंतिम निर्णय सोपविल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळाले तरी त्यांना आपल्या शुभेच्छाच राहतील. पालकमंत्री हे एक पद असले तरी रायगड जिल्ह्यात दोन मंत्री असून दोघांनीही एकत्रितपणे जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणे अधिक महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीवरच आपला भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.