ब्रिजभूषण सिंग यांच्या निर्दोष मुक्ततेवर जनवादी महिला संघटनेची नाराजी; महिला खेळाडूंना धक्का असल्याचा आरोप

उरण | विठ्ठल ममताबादे 
दिल्ली उच्च न्यायालयाने भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंग आणि सहआरोपी विनोद तोमर यांची महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणात निर्दोष मुक्तता केल्यानंतर अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय महिला खेळाडूंचा आत्मविश्वास खच्ची करणारा असून अत्याचार करणाऱ्यांना बळ देणारा असल्याची प्रतिक्रिया संघटनेने दिली.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालानंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, क्रीडा क्षेत्रासह सर्वच क्षेत्रांत महिलांना पुढे जाण्यासाठी सामाजिक व आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठविणाऱ्या महिला खेळाडूंना न्याय मिळणे आवश्यक असताना हा निकाल निराशाजनक आहे. तसेच न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेबाबतही या निर्णयामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप संघटनेने केला.
संघटनेने साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्या धैर्याचे कौतुक करत त्यांच्या संघर्षाला सलाम केला आहे. विनेश फोगाट यांनी न्यायासाठीची लढाई सुरूच ठेवण्याची भूमिका घेतल्याचे स्वागत करत हा संघर्ष भविष्यातील अत्याचारग्रस्त महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. राज्याध्यक्ष नसीमा शेख, राज्य सचिव प्राची हातिवलेकर, उपाध्यक्षा हेमलता पाटील, जिल्हाध्यक्ष सविता पाटील, धनवंती भगत, कुंदा पाटील, लता पाटील, गीता पाटील, रजनी पाटील आणि नयना म्हात्रे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली.