बोगस डॉक्टर असल्याचे सांगत कारवाईची धमकी देऊन लाचेची मागणी करणाऱ्या बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यकाला रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी (दि. ३ ऑगस्ट) पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे श्रीवर्धन तालुक्यातील आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव घनश्याम बेलाजी कोमटवार (वय ५२) असे असून ते बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक (वर्ग-३) म्हणून कार्यरत आहेत.
एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय तक्रारदार यांनी कम्युनिटी मेडिकल सर्व्हिस एसेन्शियल ड्रग्स तसेच इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन बेसिक हे अभ्यासक्रम पूर्ण केले असून ते श्रीवर्धन तालुक्यात क्लिनिक चालवितात. आरोपी कोमटवार यांनी तक्रारदाराला “तुम्ही बोगस डॉक्टर आहात. तुमच्यावर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत कारवाई करतो,” अशी भीती दाखवत कारवाई टाळण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
या तक्रारीनंतर रायगड एसीबीने शासकीय पंचांसमक्ष मागणीची पडताळणी केली. पडताळणीदरम्यान आरोपीने १० हजार रुपयांच्या मागणीवरून तडजोड करत पाच हजार रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सोमवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून पंचांसमक्ष पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने घनश्याम कोमटवार यांना रंगेहात पकडून ताब्यात घेतले.
कारवाईनंतर आरोपीची अंगझडती घेण्यात आली असून त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या राहत्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणी बोर्ली पंचतन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती सरिता आय. एस. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात श्रेणी पोलीस अंमलदार अरुण करकरे, पोलीस हवालदार महेश पाटील आणि पोलीस हवालदार नवदीत नांदगावकर यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निशांत धनवडे करीत आहेत. या कारवाईवर पोलीस अधीक्षक शिवराज पाटील तसेच अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे आणि सुहास शिंदे यांचे पर्यवेक्षण होते.