बेजबाबदारपणे एसटी बस चालविताना खड्डयामध्ये आदळली, 9 विद्यार्थी जखमी; सोशल मिडीयामुळे चालकाविरूध्द गुन्हा

Accident Student Poladpur
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
तालुक्यातील कुडपण येथून प्रवासी व विद्यार्थी घेऊन निघालेली एसटी बस क्षेत्रपाळ गावच्या हद्दीत आली असता खड्डयात आदळल्याने 7 विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी सोशल मिडीयाद्वारे अनेकांनी बसचालकाविरूध्द कारवाईची मागणी केल्यानुसार गुरूवारी उशिरा बसचालकाविरूध्द पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुरूवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कुडपण येथून पोलादपूरच्या दिशेने निघालेली बस (क्र.एमएच 20 बीएल 3775) चालक उध्दव रामचंद्र नलावडे हे चालवित होते. यावेळी बसमध्ये विद्यार्थी आणि प्रवासी असे एकूण 30 जण प्रवास करीत होते. यामध्ये गोळेगणी हायस्कूलची इयत्ता दहावीमधील विद्यार्थिनी रुपाली गंगाराम सोनावणे व वंदना पांडुरंग ढेबे, परसुले प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी प्रतिक्षा संदिप मोरे, इयत्ता सातवीतील विद्यार्थी सोहम मंगेश मोरे, इयत्ता चौथीतील विद्यार्थी संतोष गंगाराम खुटेकर, करण भिवाजी सावंत, इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी सायली संदिप मोरे, वैदेही लक्ष्मण खुटेकर व श्रेया सतीश मोरे आदी जखमी झाले.
जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे दाखल करण्यात येऊन उपचार सुरू करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्यासह स्वप्नील कदम, परेश मोरे, सुतार, संग्राम बामणे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.
यावेळी गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, प्राथमिक शाळांचे केंद्रप्रमुख मारुती कळंबे, कुडपणचे सरपंच अजय चिकणे यांनी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात जखमींची भेट घेत विचारपूस केली आणि सोशल मिडीयातील युटयूब वृत्तवाहिन्यांच्या मदतीने या अपघातातील एसटी बस चालक उध्दव रामचंद्र नलावडे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली.
या मागणीला यश येऊन गुरूवारी उशिरा बसचालक नलावडे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सोशलमिडीयामधूनच प्रसारित करण्यात आली असल्याने या अपघातप्रकरणी सोशल मिडीया प्रभावी ठरल्याचे चित्र तालुक्यात दिसून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *