अलिबाग तालुक्यातील युरिया खताची निर्माण करण्याऱ्या जगातील नंबर २ च्या असलेल्या आरसीएफ कंपनीच्या सीएसआर फंडातून कंपनी परिसरातील गावांमधील नागरिकांच्या आरोग्याची समस्या दूर करण्यासाठी फिरता दवाखानासाठी एक रुग्णवाहिका व अति अत्यावश्यक तातडीच्यावेळी एक रुग्णवाहिका असे दोन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे शुक्रवार दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास किहीम येथील आरसीएफ कॉलनी येथे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी फिरता दवाखाना व रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या कार्यक्रमास ग्रुप ग्रामपंचायत किहीमचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या सुधीर गायकवाड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य संतोष किर, गणेश भोईर, साईल पाटील, सदस्या जागृती जरंडे, जान्हवी वाघे, स्नेहा आर्ते, निधी काठे तसेच वेशवी सरपंच गणेश गावडे, सदस्य उद्धव पितळे, बोरीस-गुंजीस सरपंच सदिच्छा पाटील, सदस्य धवल राऊत, थळ ग्रामपंचायत सदस्य, वरसोली ग्रामपंचायत सदस्य नाईक व आरसीएफ कंपनीच्या अर्थ विभागाचे शिवकुमार, थळ विभागाचे प्रमुख हिरडे व सीएसआर विभागाचे खामकर, वझे व इतर प्रमुख प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कंपनीच्या परिसरातील गावांमधील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी सदर रुग्णवाहिकेमध्ये वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट व त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने मोफत फिरता दवाखाना परिसरातील गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आठवड्यातून एक दिवस ठरलेल्या दिवशी व ठरलेल्या वेळी जाऊन नागरिकांवर वैद्यकीय उपचार करणार आहेत. तसेच अति अत्यावश्यक असलेल्या रुग्णांना तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे, याचा लाभ परिसरातील सर्व घटकांतील सर्वसामान्य नागरिकांना व्हावा, हा मूळ उद्देश असल्याचे व येत्या काळात परिसरातील सर्व गावांमध्ये विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येणार असल्याचे आरसीएफ कंपनीच्या प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.